मुंबईत पोलिसांकडून हाय अलर्ट जारी:दहशतवादी हल्ला, VVIP व्यक्तींना लक्ष्य केले जाण्याची शक्यता, महिनाभर ड्रोनवर बंदी

मुंबई शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता मुंबईत महिनाभरसाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावर बंदी घातली आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केले आहे. ही बंदी 4 एप्रिल 2025 पासून 5 मे 2025 पर्यंत लागू केली जाणार आहे. पोलिस आयुक्तालायकडून या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात म्हटले आहे की, दहशतवादी किंवा राष्ट्रविरोधी घटक ड्रोन, रिमोट-कंट्रोल मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लायडर आणि हॉट एअर बलूनचा वापर करुन दहशतवादी हल्ला तसेच शहरातील व्हीव्हीआयपी व्यक्तींना लक्ष्य करण्यासाठी करू शकतात. मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जीवन धोक्यात आणू शकतात. शहरातील गर्दीची ठिकाणे देखील लक्ष्य केली जाऊ शकतात. सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू शकतात आणि बृहन्मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात कायदाव सुव्यवस्था बिघडवू शकतात. या अनुषंगाने सर्व प्रकारच्या ड्रोन वापरावर बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई तसेच या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 अन्वये दंडनीय असेल, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. सर्व संबंधितांना वैयक्तिकरित्या नोटीस बजावली जाऊ शकत नसल्यामुळे, याद्वारे एकतर्फी आदेश पारित करण्यात आला आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. कुख्यात गुंड बिश्नोई गॅंगच्या पाच सदस्यांना अटक दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अंधेरी परिसरातून कुख्यात गुंड बिश्नोई गॅंगच्या पाच सदस्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 7 पिस्तुले, 21 काडतुसे, एक इंटरनेट डोंगल आणि एक मोबाईल सीमकार्ड जप्त करण्यात आले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या सदस्यांचा मुंबईतील एका उद्योगपती आणि अभिनेत्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचे सांगण्यात आले आहे.