नीतेश राणेंना जेजुरी ग्रामस्थांचा झटका:मल्हार सर्टिफिकेटचे नाव बदलण्याची मागणी, जेजुरी मंदिराच्या विश्वस्तांना गावबंदीचा इशारा

मल्हार सर्टिफिकेटला जेजुरीमधील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. नीतेश राणे यांना हा मोठा झटका मानला जात आहे. मल्हार सर्टिफिकेशनचे नाव तत्काळ बदलावे, अशी मागणी जेजुरी ग्रामस्थांनी केली आहे. नीतेश राणे यांच्या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्यांनी भूमिका बदलावी, अन्यथा त्यांना गाव बंदी करू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांना विश्वासात न घेता जेजुरी मंदिराच्या पाच विश्वस्तांनी मुंबई येथे जाऊन नीतेश राणेंचा खंडोबा पगडी घालत सन्मान केला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी जेजुरी मंदिराच्या पाच विश्वस्तांना गाव बंदीचा इशारा दिला आहे. राज्यातील राजकारणात हलाल आणि झटक्याच्या मांसाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मंत्री नीतेश राणे यांनी चिकन आणि मटण खरेदी करणाऱ्यांसाठी मल्हार सर्टिफिकेशन नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. हिंदूंनी फक्त हिंदू दुकानातूनच मांस खरेदी करण्याचे आवाहन नीतेश राणे यांनी केले आहे. हिंदू दुकानांमधून मांस खरेदी केल्यास भेसळ होणार नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र, मल्हार या नावाला जेजुरी ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. तसेच नीतेश राणेंचा सत्कार करणाऱ्या जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांना गाव बंदीचा इशारा दिला आहे. काय म्हणाले जेजुरीचे ग्रामस्थ? मल्ल नावाच्या दैत्याचा संहार केल्यामुळे खंडोबाचे मल्हार हे नाव आहे. या नावाचा अपभ्रंश होता कामा नये. सर्टिफिकेट योजनेला मल्हार हे नाव देता कामा नये, अशी आमची शासनाला विनंती आहे. आज कुणी मटण खायला बसले, तर तो म्हणणार मला मल्हार आण रे… हे कितपत योग्य आहे? असे भविष्यात कुठेही होता कामा नये. आमची मागणी मान्य झाली नाही, तर आम्ही विश्वस्तांना गावबंदी करू, असा इशारा जेजुरीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. मल्हार प्रमाणपत्र काय आहे? मत्सोद्योग मंत्री नीतेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन नावाचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम सुरू झाले. या उपक्रमांतर्गत, राज्यातील सर्व झटका मटण दुकाने ‘मल्हार’ प्रमाणपत्र या नावाने नोंदणीकृत केली जातील. नोंदणी केल्यानंतर त्यांना मल्हार प्रमाणपत्र मिळेल. याअंतर्गत फक्त हिंदूच चिकन आणि मटणाची दुकाने चालवतील. हिंदू व्यापारी MalharCertification.com नावाच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे नोंदणी करू शकतील आणि प्रमाणपत्रे मिळवू शकतील. या प्रमाणपत्रामुळे लोकांना शुद्ध आणि भेसळमुक्त झटक्याचे मांस मिळेल, असा दावा नीतेश राणे यांनी केला आहे. हिंदूंनी फक्त ‘मल्हार प्रमाणित’ दुकानांमधून मांस खरेदी करण्याचे आवाहन नीतेश राणे यांनी केले आहे, यामुळे हिंदू तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. यामुळे मांस व्यापारात हिंदू समुदायाचेही पुरेसे प्रतिनिधित्व होईल, असेही नीतेश राणे म्हणाले.