“गैर’हिंदूबहुल वस्तीत मंदिरात मूर्तींवर करा गंगाजल अभिषेक:विहिंपचे क्षेत्र मंत्री शेंडेंचे आवाहन

राज्यातील १ लाख अपरिचित मंदिरातील मूर्तींवर कुंभातील गंगाजलाचा अभिषेक करण्यात येणार आहे. त्यातही “गैर’ हिंदूबहुल वस्तीत टिकून राहिलेल्या संवेदनशील मंदिरातील मूर्तींवर कुंभातील गंगाजलाचा अभिषेक करा आणि त्याचे फोटो घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे आवाहन विहिंपचे क्षेत्र मंत्री गोविंद शेंडे व मंदिर आयामाचे क्षेत्र संपर्कप्रमुख अनिल सांबरे यांनी येथे पत्रपरिषदेत केले. गुढीपाडव्यापासून हनुमान जयंतीपर्यंत रामोत्सव साजरा करणार असल्याची माहितीही शेंडे व सांबरे यांनी दिली. विविध पद्धतीने रामोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करावा, असेही आदेश त्यांनी दिले आहेत. मंदिरांनी पुढाकार घ्यावा सध्या आमचे हिंदू नववर्ष ५१२६ सुरू आहे. येत्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून ५१२७ हे नवीन वर्ष सुरू होईल. हिंदूंचे नवीन वर्ष एक जानेवारी नाही तर चैत्र शुद्ध प्रतिपदापासून सुरू होते. या नववर्ष स्वागताचे धार्मिक क्षेत्रातील नेतृत्व मंदिरांनी करावी, ही समाजाची स्वाभाविक अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.