कुख्यात गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी:पुणे पोलिसांकडून मकोका, मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी मोठी कारवाई

कुख्यात गुंड गजा मारणेची जेलमध्ये रवानगी:पुणे पोलिसांकडून मकोका, मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी मोठी कारवाई

पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची रवानगी जेलमध्ये करण्यात आली आहे. तसेच गाजा मारणे आणि त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांकडून मकोका लावण्यात आला आहे. 19 फेब्रुवारी रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्तीयाला मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे व त्याच्या टोळीला अटक करण्यात आली होती. आज त्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास गजा मारणे आणि त्याच्या टोळीला न्यायालयात हजर करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्याच्या 19 तारखेला गजा मारणे हा इतर 35 जणांसोबत छावा हा चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. यावेळी गजा मारणे हा फॉर्च्यूनरमध्ये होता तर त्याचे सहकारी दुचाकीवर आले होते. चित्रपट पाहून परत येत असताना गजा मारणेच्या टोळीतील एका सडस्याचे कोथरूडच्या भेलकेनगर चौकात देवेंद्र जोग या तरुणासोबत भांडण झाले. यावेळी देवेंद्र जोगला बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी गजा मारणे तिथेच उपस्थित होता. चिथावणी देण्यासाठी गजा मारणेचाच पुढाकार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात गजा मारणेसोबत चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या सर्वच जणांचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच आधीच अटक झालेल्यांचे दुचाकी देखील जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी तपासासाठी शहरतील आठ ठिकाणांचे सीसीटीवही तपासले आहेत, त्यानुसार इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पोलिसांनी सध्या गजा मारणेसह ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोडिंबा पडवळ, अमोल विनायक तापकिर या चौघांना अटक केली आहे. मात्र, गजा मारणेचा भाचा श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार, रुपेश मारणे हे दोघे फरार झाले आहेत. या मारहाणीप्रकरणी देवेंद्र जोग यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. देवेंद्र जोग हे आयटी अभियंता असून भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला मारहाणीचे कलम दाखल केले होते. मात्र, प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेत आरोपींविरोधात खुनाच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याचे कलम वाढवण्यात आले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment