आमचा नेता खूश नाही आणि आम्हीही:शिवसेना नेत्याचे सूचक विधान, भाजपवरील दबाव वाढला; एकनाथ शिंदे आजारी पडल्याचीही वार्ता

आमचा नेता खूश नाही आणि आम्हीही:शिवसेना नेत्याचे सूचक विधान, भाजपवरील दबाव वाढला; एकनाथ शिंदे आजारी पडल्याचीही वार्ता

महाराष्ट्रातील नवे सरकार स्थापन करण्याचा मुद्दा आता अत्यंत रंजक वळणावर पोहोचला आहे. भाजपने एकीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे, राज्याचे हे सर्वोच्च पद हातचे जात असल्यामुळे एकनाथ शिंदे कमालीचे नाराज असल्याची बातमी आहे. त्यातच शिवसेनेच्या एका नेत्याने आमचा नेता खूश नाही व आम्हीही नाही असे विधान करून शिंदेंच्या नाराजीची एकप्रकारे पुष्टीच केली आहे. त्यामुळे राज्यातील कथित ‘सत्तासंघर्ष’ पुढील काही तासांत अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र विधानसभेत सत्ताधारी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजपच्या पारड्यात सर्वाधिक 132 जागा गेल्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 57 व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे साहजिकच शिंदे यांच्या ताब्यातील मुख्यमंत्रीपद भाजपच्या दिशेने गेले. आता भाजपने या पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्याची माहिती आहे. त्यांचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचीही चर्चा आहे. पण या घटनाक्रमामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्र्यांचे खरे दावेदार शिवसेनेच्या एका नेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना शिंदे नाराज असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. आमचे नेते खूश नाहीत व आम्ही ही नाही. एकनाथ शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात काहीही चुकीचे केले नाही. त्यांच्याच नेतृत्वात विधानसभेची निवडणूक लढली गेली. त्यामुळे तेच महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचे खरे दावेदार होते. लॉजिकली, त्यांनाच मुख्यमंत्री करण्याची गरज आहे, असे या नेत्याने म्हटले आहे. एकनाथ शिंदे पडले आजारी दुसरीकडे, शिवसेना प्रवक्ते उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे नाराज असल्याचे वृत्त फेटाळले आहे. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. ते आजारी पडलेत. त्यांना ताप व सर्दी झाली आहे. त्यामुळे ते खूश नाहीत असे म्हणणे चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे त्यांना मार्गदर्शन करावे असे शिवसेनेचे म्हणणे आहे, असे ते म्हणालेत. विश्लेषकांच्या मते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या दरे या मूळगावी गेलेत. याचा अर्थ राज्य सरकार स्थापन करण्यात आणखी काही दिवसांचा विलंब होऊ शकतो. शिवसेना गृह खात्यावर अडून या घडामोडीत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेला राज्याचे गृहमंत्रीपद हवे असल्याचे ठणकावून सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला सारण्याचा प्रयत्न होत आहे. आम्हाला गृह खाते मिळालेच पाहिजे. हा विधाग सामान्यतः उपमुख्यमंत्र्यांकडे असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा विभाग स्वतःकडे ठेवला तर ते योग्य नाही, असे ते म्हणालेत. संजय राऊत यांचा महायुतीतील घडामोडींवर निशाणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनाक्रमावरून महायुतीवर सडकून टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, भाजपची काय मजबुरी आहे? हे आश्चर्यकारक आहे. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या सारख्या ताकदवान नेत्यांकडून आदेश येतात, तेव्हा सर्वजण त्याचे पालन करतात. मान्य करता. कारण, लोक त्यांना घाबरतात. पण निवडणूक निकाल लागून 8 दिवस झालेत. पण अद्याप स्पष्ट बहुमत असतानाही महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही. येथील काळजीवाहू मुख्यमंत्री गावात जावून बसलेत. कधी शपथविधी होणार व कोण मुख्यमंत्री कोण होणार? याची कोणतीच खबरबात कुणाला नाही, असे ते म्हणालेत. हे ही वाचा… सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग:भाजप आज पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करणार, देवेंद्र फडणवीसांसाठी राजनाथ सिंह लकी मुंबई – महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकार स्थापन करण्यासाठी 1 डिसेंबर रोजी भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला जाईल. त्यामुळे पक्ष निरीक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. भाजप आज पर्यवेक्षकांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस सर्वात आघाडीवर आहेत. पण भाजप सरप्राईज देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यवेक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. वाचा सविस्तर

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment