पहलगाम पिडितांचा अवमान करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा:काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन भूमिका जाहीर करा, श्रीकांत शिंदेंनी कॉंग्रेसला खडसावले

पहलगाम दहशतवादी हल्यावर चर्चा करण्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी करण्यापूर्वी अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे (AICC) अधिवेशन बोलावून ज्या काँग्रेस नेत्यांनी पहलगाम पीडितांचा अपमान केला त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबत भूमिका जाहीर करावी, अशा शब्दांत शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेस पक्षाला खडसावले. मुंबईत ते बोलत होते. खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, काँग्रेसने आधी स्वतःकडे पहावं. संसद अधिवेशनाची मागणी करण्याआधी काँग्रेसने तात्काळ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) अधिवेशन बोलवावे आणि आपल्या वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडावी. विजय वडेट्टीवार यांनी पीडितांच्या अनुभवांवर शंका घेतली, कर्नाटकातील काँग्रेस मंत्री आर. बी. थिम्मापूर आणि श्री. सिद्धरामय्या यांनी धर्म विचारुन दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला नाकारलं, सैफुद्दीन सोज यांनी पाकिस्तानच्या वक्तव्यावर विश्वास ठेवण्याचं सुचवलं आणि तारीक हमीद कर्रा यांनी पाकिस्तानसोबत संवादाची मागणी केली, ही केवळ वैयक्तिक मतं नाहीत, तर एक धोकादायक आणि देशविरोधी विचारसरणीचे लक्षण आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. रॉबर्ट वड्रा यांनी केलेलं वक्तव्य की “आतंकवाद्यांनी भारतातील मुस्लीमांवरील कथित अन्यायामुळे हल्ला केला” हे पूर्णपणे निंदनीय आणि निषेधार्ह आहे. काँग्रेस नेत्यांची अशी वक्तव्यं केवळ राजकीय अपरिपक्वता नाही तर पीडितांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. हल्ल्यात मृत पावलेल्या बांधवांच्या विधवा पत्नी आणि अनाथांच्या वेदनांचा उपहास करण्यासारखे अमानवी कृत्य आहे. काँग्रेसने स्पष्ट सांगावं की ते दहशतवाद्यांच्या हल्ल्याने पिडीत झालेल्या निर्दोष नागरिकांच्या बाजूने आहे की आपल्या नेत्यांच्या ज्यांनी आतंकवाद्यांचं समर्थन केलं? असा सवाल खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. या राष्ट्रीय संकटात देशाला एक ठाम आणि एकत्रित भूमिका हवी आहे. दिशाभूल करणारी, तुष्टीकरणावर आधारित भूमिका नको, असे खासदार डॉ. शिंदे यांनी काँग्रेस नेत्यांना खडसावले.