पैठण शहरामधील तीर्थस्तंभाला राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा:नागरिकांनी केली मागणी, तीर्थस्तंभावर गुढी उभारून काढली शोभायात्रा

दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण येथील सम्राट शालिवाहननगरीत रविवारी हिंदू वार्षिक कालगणना शके प्रारंभ उत्सव साजरा करण्यात आला. जुन्या पैठणमधील प्राचीन तीर्थस्तंभातील उद्यानात माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे, किशोर चौहान, जितू परदेशी, पवन लोहिया, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, संतोष गव्हाणे, शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नववर्षाची गुढी उभारण्यात आली. या वेळी तीर्थस्तंभ राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यानिमित्ताने पैठण शहरातून सम्राट शालिवाहन यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. मराठी नववर्षाला पैठण या भूमीतून सुरुवात होते. या ठिकाणी भव्य उत्सव शासकीयस्तरावर होणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. शालिवाहनकालीन स्तंभ वगळता २८ एकरांतील प्राचीन स्थळ पूर्णतः विकसित करण्यासाठी शासकीय स्तरावर कारवाई करावी, सद्य:स्थितीत हा परिसर पालथीनगरी म्हणून ओळखला जातो. सदरील २८ एकर जागेत वेड्या बाभळी उगवल्या आहेत. त्यामुळे हा परिसर नष्ट होत आहे. याची गंभीर दखल केंद्र व राज्य शासनाने घ्यावी तसेच तीर्थस्तंभ राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष पवन लोहिया, बलराम लोळगे यांच्या वतीने शोभायात्रेत थंड पदार्थांचे वाटप करण्यात आले. गुढीपाडव्यास मराठी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे इंग्रजी कॅलेंडर आपण मानतो तसेच मराठी कॅलेंडर आहे. या कालगणनेची सुरुवात आपल्या पैठणनगरीतून झाली हे नव्या पिढीला माहीत असणे आवश्यक आहे, असे मत माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी व्यक्त केले. असा आहे शकेचा इतिहास दक्षिण भारतात सातवाहन घराण्यातील एका मराठी राजाने स्वतंत्र व सार्वभौम राज्य निर्माण करण्याचा पराक्रम केला. शक-क्षत्रप राजांचा पराभव करून स्वतंत्र राज्याची पहिली गुढी पैठण शहरात उभारली आणि शालिवाहन शक नावाची कालगणना सातवाहन राजाने सुरू केली. सातवाहन आणि शालिवाहन एकच. सातवाहन हे प्राकृत, तर शालिवाहन हे संस्कृत नाव आहे. सातवाहन साम्राज्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची पताका फडकावली. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा शालिवाहन शक कालगणनेतील पहिला दिवस. हा दिवस शालिवाहन राजाच्या पराक्रमाची आठवण करून देणारा दिवस आहे.