प्रशांत कोरटकरला केव्हाही अटक होणार:हायकोर्टात दिलासा नाही, आता पुढील सुनावणी सोमवारी; कोल्हापूर कोर्टाने केला जामीन रद्द

मुंबई उच्च न्यायालयाने कथित पत्रकार प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी सोमवारपर्यंत लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशांत कोरटकरवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी व इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्याने कोल्हापूर कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. पण कोर्टाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावर आज सुनावणी अपेक्षित होती. पण कोर्टाने ऐनवेळी ही सुनावणी सोमवारपर्यंत लांबणीवर टाकली. यामुळे कोर्टात तूर्त दिलासा न मिळालेल्या कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः तो शरण येण्याची शक्यताही या प्रकरणी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरची आपल्या अंतरिम जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवण्याची केलेली मागणी फेटाळून लावली होती. यासंबंधी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला. पण त्यानंतर त्याने एका स्वतंत्र अर्जाद्वारे कोर्टाला आपल्या अंतरिम जामिनाची मुदत 7 दिवसांनी वाढवण्याची एक नवी विनंती. यासाठी त्याने मुंबई हायकोर्टाच्या एका खटल्याचा दाखला दिला. पण कोर्टाने त्यांनी दाखला दिलेल्या प्रकरणात आरोपी स्वतः कोर्टापुढे हजर होता, पण इथे तशी परिस्थिती नसल्याचे नमूद करत त्यांची विनंती फेटाळून लावली होती. त्यामुळे यापूर्वीच त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. कोण आहे प्रशांत कोरटकर? शांत कोरटकर हा मुळचा माहूरचा आहे. त्याने हिंगणघाट येथे शिक्षण घेतले. चंद्रपूर येथून जनसंपर्क विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांनी 2000 साली नागपूरमधून टीव्ही पत्रकारिता सुरु केली. त्यांनी वेगवेगळ्या वृत्तवाहिनीमध्ये काम केले. त्यानंतर ‘विदर्भ माझा’ या यूट्यूब चॅनलचेही संपादकही ते राहिले. कोरटकर सोशल मीडियावर विशेषतः फेसबुकवर खास सक्रीय असतात. याशिवाय त्यांचा उच्च पदावरील नेते व अधिकारी यांच्याशी ही चांगला संपर्क आहे. एका विदेशी विद्यापीठाकडून पी. एच. डी. मिळवली आहे.