पुण्यातील गरजू विद्यार्थिनींसाठी पोषक आहाराची सोय:चंद्रकांत पाटलांच्या पुढाकाराने जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे 100 विद्यार्थिनींना जेवणाचे डबे

मनुष्याला निरोगी जीवनशैलीसाठी पोषक आणि संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे. पोषक आणि संतुलित आहाराविना अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. पुण्यासारख्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात असंख्य विद्यार्थी अतिशय दुर्गम भागातून शिक्षणासाठी येत असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून आता ‘जिव्हाळ्या’चा पोषक आहार मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात 100 विद्यार्थिनींना हे जेवणाचे डबे पुरवले जाणार आहेत. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने देशभरातून असंख्य विद्यार्थी शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शहरात येत असतात. यातील अनेक विद्यार्थी हे गरीब, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील असतात. त्यामुळे आपल्या आई-वडिलांवर खर्चाचा अतिरिक्त ताण पडू नये, म्हणून पोटाला चिमटे काढत हे सर्व विद्यार्थी शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांची परवड थांबावी; यासाठी चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पाटील यांनी कोथरुड मधील जिव्हाळा फाउंडेशनच्या मदतीने १०० विद्यार्थिनींना पोषक आणि संतुलित आहार उपलब्ध करून दिला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आला. पाटील यांच्या हस्ते गरजू विद्यार्थिनींना पोषक आहाराचे डबे वितरीत करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधताना पाटील म्हणाले की, निरोगी जीवनशैलीसाठी पोषक आणि संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामगिरी उंचावणे अशक्य आहे. गरीब आणि गरजू विद्यार्थी विशेष करुन विद्यार्थिनींनी योग्य माध्यमातून आपल्या अडचणी पोहोचवल्या, तर त्या सोडवण्यास नेहमीच कटिबद्ध आहे, अशी भावना व्यक्त केली. यावेळी जिव्हाळा फाउंडेशनच्या शर्वरी मुठे, राजेंद्र मुठे, स्टुडंट्स हेल्पिंग हॅण्डचे ॲड. कुलदीप आंबेकर, पत्रकार प्राची कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.