पुष्पा चौधरीची लावणी विश्वविक्रमाची तयारी:51 लावण्या सलग सादर करणार, पुण्यात 26 मार्चला कार्यक्रम

लावणीच्या समृद्ध परंपरेला जागतिक पातळीवर नेण्यासाठी अभिनेत्री गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा प्रदीप चौधरी अनोखा विश्वविक्रम करणार आहेत. सलग ५१ लावणी गीतांचे सादरीकरण करून ‘वर्ल्ड रेकॉर्डस इंडिया’ आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल’ मध्ये विक्रम नोंदवण्यासाठी त्या सज्ज आहेत. विश्वविक्रमाचा हा सोहळा बुधवार, दिनांक २६ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे, अशी माहिती पुष्पा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला रत्ना दहीवेलकर, अनिरुद्ध हळंदे उपस्थित होते. स्वामिनी म्युझिक, डान्स अँड अॅक्टींग अकॅडमी वारजे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मराठी लावणी ला जागतिक पातळीवर नेण्यासाठी पुष्पा चौधरी यांनी या विश्वविक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ कलाकार लीला गांधी, सुरेखा पुणेकर, माया खुटेगावकर, श्वेता शिंदे, माधुरी पवार, प्राजक्ता गायकवाड, प्रतीक्षा जाधव, आरती शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, सिद्धेश्वर झाडबुके, सुरेश विश्वकर्मा, प्रदीप कोथमीरे तसेच कला व सामाजिक क्षेत्रातील मंडळी याशिवाय वॅलेंटिना ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे विश्वस्त देखील उपस्थित राहणार आहेत. पुष्पा चौधरी म्हणाल्या, मराठी लावणी कला व संगीत जगभर पोहोचावे यासाठी मी माझ्या आवाजाच्या माध्यमातून विविध ५१ लावण्यांचे बोल व गाणी न थांबता सलग सादर करणार आहे. जागतिक विक्रमामध्ये नोंद होण्यासाठी मराठी लावण्या गाण्याचा मानस आहे. यासाठी आवश्यक वेळ चार तासांपेक्षा जास्त असणार आहे. तरी पुणेकरांनी या विश्वविक्रमाचे साक्षीदार होण्यास उपस्थित रहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे