राज-उद्धव ठाकरे युतीची चर्चा:छत्रपती संभाजीनगरमध्ये घडामोडींना वेग, दोन बड्या नेत्यांनी घेतली भेट

राज-उद्धव ठाकरे युतीची चर्चा:छत्रपती संभाजीनगरमध्ये घडामोडींना वेग, दोन बड्या नेत्यांनी घेतली भेट

महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या एका मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले होते, महाराष्ट्रसमोर आमची भांडणे, वाद हे किरकोळ आहेत. त्यामुळे एकत्र येण्यात मला तरी कुठलीही अडचण वाटत नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी देखील एका भाषणात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते व मनसे नेते भेटल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मनसेचे नेते सुहास दशरथे यांनी ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली आहे. ठाकरे बंधूंच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. लोकलमध्ये आम्ही सर्व नेते एकत्रच काम करतो. सगळ्यांना आनंद झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना आनंद झाला आहे, दोन्ही भाऊ एकत्र येणार आहेत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. मनसे नेते सुहास दशरथ या भेटीवर बोलताना म्हणाले, युती संदर्भात कोणी काही बोलू नका, असा आदेश राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे यावर मी काही जास्त भाष्य करणार नाही. परंतु लग्नामध्ये आम्ही आता भेटलो. त्यामुळे जुने सहकारी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वर्ष सत्तेत राहिलेले मोठे नेते म्हणून चंद्रकांत खैरे यांचा सत्कार करण्याची इच्छा झाली. हे दोन्ही बंधू एकत्र येतात ही आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. मी खैरे यांना सांगितले पुन्हा एकदा तुम्ही आमचे मार्गदर्शक व्हा, संपूर्ण मराठवाड्यात मनसे आणि शिवसेना जोरदार घोडदौड करेल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment