राऊत-वडेट्टीवारांच्या आरोपाला उदय सामंत यांचे सडेतोड उत्तर:हा राजकीय बालिशपणा; शिंदेसोबत भविष्यातही राहणार असल्याचा दावा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून ते त्यांच्या गावी गेले असल्याचा आरोप करत उदय सामंत यांच्या नेतृत्वात नवीन ‘उदय’ होणार असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. संजय राऊत यांचा हा राजकीय बालिशपणा असल्याचे पलटवार सामंत यांनी केला आहे. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याला देखील सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे राजकीय बालिशपणा आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला होता, त्या उठावा मध्ये मी देखी सामील होतो. त्याचमुळे मला दोन वेळा राज्याचे उद्योगमंत्री पद मिळाले, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नेत्याने मला राजकीय जीवनात घडवण्यासाठी प्रयत्न केले. ते मी कधीही विसरू शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे राजकारणापलीकडचे आहेत. आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा केविलवाना प्रयत्न कधीही यशस्वी होणार नसल्याचा दावा देखील सामंत यांनी केला आहे. या माध्यमातून सामंत यांनी संजय राऊत यांनी केलेला दावा फेटाळून लावला आहे. वडेट्टीवार यांनाही प्रत्युत्तर याच विषयावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील वक्तव्य केले होते. त्यावर देखील सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, ‘विजयजी, एकनाथ शिंदे असो, मी असो किंवा तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातून वर आलेले आहे. त्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला सामंत यांनी वडेट्टीवार यांना दिला. तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना किती वेळ मला भेटला, त्याची पूर्ण माहिती मला आहे. मात्र मी काही राजकीय इथिक्स पाळतो. त्याचमुळे मी कधीच कोणाची वैयक्तिक बदनामी करण्यासाठी टीका करत नसल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. मात्र कोणीही सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असे फालतू षडयंत्र कोणी करू नये, ही माझी सूचना असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. शिंदेसोबत होतो आणि भविष्यातही राहणार संजय राऊत आणि वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केले ते धादांत खोटे असल्याचा दावा सामंत यांनी केला आहे. त्या दोषांचे वक्तव्य हे निषेध करण्यासारखे आहे आणि त्याचा मी निषेध करतो. मी एकटाच शिंदे यांच्यासोबत होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्या वेळी त्यांना गरज असेल त्या त्यावेळी सहकारी म्हणून त्यांच्यासोबत असेल. या माध्यमातून आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला गेला, ते कधीही यशस्वी होणार नसल्याचा सामंत यांनी म्हटले आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी केलेला आरोप देखील पहा…. उदय सामंतांसोबत 20 आमदार असल्याचा संजय राऊत यांचा दावा:शिंदेंच्या नाराजीचे कारण काय? म्हणत साधला निशाणा एका गटाच्या मंत्र्यांनी दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यावर हात उचलला, एवढेच महाराष्ट्राच्या नशिबी पाहणे बाकी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पालकमंत्री पदाच्या नाराजीवर संजय राऊत यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली आहे. पालकमंत्री पदाबाबत आपसात वाद सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र राग आल्यानंतर ठाण्याचे उपमुख्यमंत्री गावाकडे निघून जातो, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की ते गावाकडे जाऊन बसतात, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पूर्ण बातमी वाचा….