रविंद्र चव्हाण भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष:लवकरच चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्वीकारणार जबाबदारी, मंत्रिमंडळात मिळाले नव्हते स्थान
भाजप नेते आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. रविंद्र चव्हाण यांची भाजप महाराष्ट्राचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही नियुक्ती केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रविंद्र चव्हाण यांच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंत्रिपदाची शपथ घेतली. पण भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते पक्ष-संघटनेत प्रदेशाध्यक्ष होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर अखेर आज शिक्कामोर्तब झाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या पत्राद्वारे शिर्डीतील भाजपच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते. सलग चौथ्यांदा डोंबिवली विधानसभेतून निवडून आलेले आहेत. मात्र, यंदा त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळाले नाही. दुसरीकडे भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला असून महसूल मंत्रिपद मिळाले आहे, त्यानंतर आता रवींद्र चव्हाण यांना महाराष्ट्र भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपद मिळाले आहे. रवींद्र चव्हाण यांची जमेची बाजू
राज्यात मराठा आंदोलनानंतर लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. यामुळे जर आता मराठा समाजाचा प्रदेशाध्यक्ष दिल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपला फायदा होऊ शकतो. यापूर्वी कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, ठाणे, पनवेल, महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका बजावल्याने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संघटनांवर वर्चस्वासाठी त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. 2024 मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार झालेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या ज्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली, त्या निवडणुकीत भाजपला त्यांनी विजय मिळवून दिला आहे.