संगीत रंगभूमीला लोकाश्रय मिळावा:उल्हास पवार यांचे मत; अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी रंगभूमी, पुणेतर्फे स्नेहमेळावा

संगीत रंगभूमीला लोकाश्रय मिळावा:उल्हास पवार यांचे मत; अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मराठी रंगभूमी, पुणेतर्फे स्नेहमेळावा

स्वातंत्र्यपूर्व काळात अन्योक्तीपूर्ण नाटकांची परंपरा होती. संगीत नाटकांमधून फक्त मनोरंजनच नव्हे तर प्रबोधनही होत असे. आज मराठी संगीत रंगभूमीची स्थिती पूर्वीसारखी वैभवशाली राहिलेली नाही. शिलेदार कुटुंबियांनी मराठी रंगभूमी, पुणेच्या माध्यमातून संगीत रंगभूमी जीवंत ठेवली आहे. दीप्ती भोगले आणि सहकारी आजही संगीत रंगभूमीची परंपरा प्रवाहित ठेवण्याचा कसोशिने प्रयत्न करीत आहेत. संगीत रंगभूमीला लोकाश्रय मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार यांनी व्यक्त केली. मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अश्वमेध हॉल येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पवार बोलत होते. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात सहभागी झालेल्या तंत्रज्ञ आणि कलाकारांचा सन्मान तसेच संस्थेच्या गौरविकेचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या प्रमुख दीप्ती भोगले, उद्योजक किशोर देसाई, ज्येष्ठ गायक-अभिनेत्री वर्षा जोगळेकर मंचावर होते. जयराम, जयमालाबाई आणि कीर्ती शिलेदार यांच्या आठवणींना उजाळा देताना उल्हास पवार म्हणाले, शिलेदार कुटुंबियांनी एक परिवार, एक संस्था, एक रंगभूमीच्या माध्यमातून कायम निष्ठेने काम केले. आपल्या गुरूंप्रती ते सदैव कृतज्ञ राहिले. अनेक दिग्गज कलाकार या संस्थेच्या माध्यमातून घडले. ते पुढे म्हणाले, संगीत नाटकांद्वारे रसिकांचे वैचारिक भरण-पोषण होत असे. पूर्वी रंगमंदिरात जाऊन संगीत नाटक बघण्याची मौज वेगळीच होती पण मनोरंजनाची साधने सहजतेने उपलब्ध होत असल्याने आज तसे अभावानेच घडते आहे. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांचाच नव्हे तर पडद्यामागील कलाकारांचाही गौरव केला ही अभिमानास्पद बाब आहे. सुरुवातीस वर्षा जोगळेकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला. संस्थेच्या कार्यात योगदान देणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ, सुहृदांच्या सहकार्याविषयी दीप्ती भोगले यांनी कृतज्ञता व्यक्त केली. संगीत रंगभूमीने घडविले; आत्मभान दिले.. संगीत रंगभूमीने आम्हाला घडविले; आत्मभान दिले अशा भावना मराठी रंगभूमी, पुणेच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कलाकार-तंत्रज्ञांनी व्यक्त केल्या. संगीत रंगभूमीने आम्हाला काय दिले याविषयी उपस्थित कलाकारांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, संगीत रंगभूमीने आम्हाला मान-सन्मान, समाधान, आनंद, उर्जा, वाणीसंस्कार, मराठी भाषा-काव्य-साहित्याची ओळख, शाश्वत मूल्ये दिली. संगीत रंगभूमीची वैभवशाली परंपरा टिकविण्यासाठी तसेच पुढील पिढीकडे प्रवाहित ठेवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करू अशी ग्वाही कलाकारांनी दिली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment