संजय राऊतांच्या छातडात भगवा झेंडा गाडून निवडून आलो:असे तसे नाही, छप्पर फाडके आलो; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

शिवसेना शिंदे गटाचे आमदार व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बुलढाणा येथे शिवसेना शिंदे गटाची आभार सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात ते बोलत होते. संजय राऊतांच्या छातडात भगवा झेंडा गाडून निवडून आलो, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केला आहे. गुलाबराव पाटील म्हणाले, माझ्या नगरपालिकेचे मतदान 24 हजार आहे आणि 339 कोटी रुपये दिले. पत्र दिले आला गल्ला, पत्र दिले आला गल्ला. आम्हाला वाटले आम्ही स्वप्नात आहोत. आम्ही असे तसे निवडून आलो नाही, छप्पर फाडके निवडून आलो आहोत. आम्ही जळगाव जिल्ह्यातून साहेबांबरोबर पाच जण गेलो होतो. पाचही जण निवडून आलो. त्या संजय राऊतच्या छातड्यात भगवा झेंडा गाडून निवडून आलो, असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी केला आहे. जे गुवाहाटीला गेले ते निवडून येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले होते. पुढे बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ज्यावेळी वारा आला, आपत्ती आली, त्यावेळी सगळ्यात अगोदर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचले. तुम्ही त्यांना बदनाम करता, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. गुलाबराव पाटील म्हणाले, विधानसभेत म्हणालो होतो, आभार मानायला येईल, म्हणून आलो आहे. जनतेच्या पावसात भिजणारा भाऊ येथे आला आहे. मुख्यमंत्री होते, तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केले. आजही करणार, उद्याही करणार आणि करत आहे. राजकीय तापमान शिवसेनेने वाढविले. थंडगार हवा खायला कुठेतरी गेले. लाडके भाऊ आणि लाडकी बहीण यांनी विरोधकांना गप्प केले. पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांचा सिंचनाचा विषय घेतला. आघाडीच्या काळात फक्त चार प्रकल्पांना मान्यता दिली, पण युतीच्या काळात दीडशे प्रकल्पांना मान्यता दिली. जो उठाव केला तो उठाव एकनाथ शिंदे यांनी दाखविला. शिवसेना दावणीला बांधणीचे काम केले. एकही आमदार निवडून येणार नाही म्हणायचे पण 60 जागा निवडून आल्या. बाळासाहेबांची विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब जनतेने केले आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.