उदय सामंतांसोबत 10 आमदार असल्याचा संजय राऊत यांचा दावा:शिंदेंच्या नाराजीचे कारण काय? म्हणत साधला निशाणा
एका गटाच्या मंत्र्यांनी दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यावर हात उचलला, एवढेच महाराष्ट्राच्या नशिबी पाहणे बाकी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पालकमंत्री पदाच्या नाराजीवर संजय राऊत यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केली आहे. पालकमंत्री पदाबाबत आपसात वाद सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. मात्र राग आल्यानंतर ठाण्याचे उपमुख्यमंत्री गावाकडे निघून जातो, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ठाण्याच्या उपमुख्यमंत्र्यांना राग आला की ते गावाकडे जाऊन बसतात, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे कायमच अस्वस्थ आत्मा आहेत. यावेळी त्यांनी महाकुंभामध्ये नागा साधूकडे जाऊन बसायला हवे होते. नागा साधू हे कायम अस्वस्थ असतात. त्यामुळे महाराष्ट्राचे जे नेते अस्वस्थ आहेत, त्यांच्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथे राहण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जाऊन गंगेत डुबकी घ्यावी, काही धर्मकार्य करावे, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका, तुमची राजकीय अस्वस्थता ही महाराष्ट्राच्या विकासाच्या मुळावर असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यामुळे अस्वस्थ मंत्र्यांनी कुंभमेळात जाऊन ध्यान धारणा करावी, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला. शिंदेंच्या नाराजीचे नेमके कारण काय? लहान मूल रुसावे आणि कोपऱ्यात जाऊन बसावे, असे चालणार नाही. तर नाराजीचे नेमके कारण काय? हे महाराष्ट्राला कळायला पाहिजे. पद, प्रतिष्ठा, खंडणी, नेमके नाराजीचे कारण काय? हे आम्हाला कळायला हवे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेस कुठे आहे? बाळासाहेब ठाकरे यांना देखील संपवण्याच्या वल्गना करण्यात आल्या होत्या. उद्धव ठाकरे यांना संपवण्याची भाषा किंवा संपल्याची भाषा काँग्रेसवाले करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे, शिवसेना कधीही संपली नाही आणि संपणार नाही. असा दावा राऊत यांनी केला. अशा वेळी तुम्ही कुठे आहात? असा प्रतिप्रश्न देखील राऊत यांनी काँग्रेसला विचारला आहे. भाजपने शिवसेनेच्या बाबतीत जे केले, तेच एकनाथ शिंदे यांच्या नशिबी पुढे ठेवलेले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. उदय सामंतांसोबत 10 आमदार असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांसोबत डावोसला गेलेल्या उदय सामंत यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. सत्ता स्थापन करताना एकनाथ शिंदे रुसले होते, त्याचवेळी उदय सामंत यांना घेऊन सत्ता स्थापन करण्याची तयारी भाजपवाल्यांनी केली होती, असा मोठा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे. शिंदे रुसले त्याच वेळी हा ‘उदय’ होणार होता. अशा शब्दात संजय राऊत यांनी त्यांच्यासोबत वीस आमदार असल्याचा दावा केला आहे.