संतोष देशमुख प्रकरणी नवीन एसआयटी:वाल्मीक कराडच्या संपर्कातले अधिकारी वगळण्यात येणार, आमदार सुरेश धसांनी दिली माहिती

संतोष देशमुख प्रकरणी नवीन एसआयटी:वाल्मीक कराडच्या संपर्कातले अधिकारी वगळण्यात येणार, आमदार सुरेश धसांनी दिली माहिती

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लावण्यात आलेली एसआयटी आता बदलण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जुन्या एसआयटीच्या ठिकाणी आता नवीन एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. जुन्या एसआयटीमध्ये वाल्मीक कराडच्या ओळखीचे अधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत होता त्यामुळे नवीन एसआय टी स्थापन करण्यात आली आहे. 1 जानेवारी 2025 साली संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मात्र या एसआयटीवर देशमुख कुटुंबीयांनी आक्षेप घेतला होता. त्या एसआयटीमध्ये असलेले काही पोलिस हे वाल्मीक कराडच्या थेट संपर्कातले असल्याचा आरोप करण्यात आला होता. वाल्मीक कराडचे या अधिकाऱ्यांसोबत सोशल मीडियावर फोटो देखील व्हायरल झाले होते. त्यामुळे तपास प्रभावित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे राज्य सरकारने नवीन एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. जुन्या एसआयटीमध्ये 10 सदस्य होते, आता नवीन एसआयटीमध्ये 7 सदस्य असणार आहेत. दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट तपास यंत्रणेने घेतली. यावेळी आयपीएस बसवराज तेली उपस्थित नव्हते, ते उद्या येणार असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे. तसेच तपास कुठपर्यंत आला आहे याची माहिती आम्हाला मिळत नसल्याचा आरोपही धनंजय देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 34 दिवस उलटून गेले आहेत. या काळात पोलिसांनी आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणहून ताब्यात घेतले. विष्णू चाटे हा या प्रकरणातील महत्वाचा आरोपी असून, आज त्याला न्यायालयीन कोठडी मिळणार की, पोलिस कोठडी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. केज न्यायालयात आज यावर सुनावणी पार पडली. न्यायालयाने अवघ्या काही मिनिटांतच विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी सुनावली.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment