संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचा पहिलाच बीड दौरा:सुरेश धस यांच्या मतदारसंघात कार्यक्रम; पंकजा मुंडेंची उपस्थिती तर धनंजय मुंडे गैरहजर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीडच्या दौऱ्यावर आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण समोर आल्यानंतर तसेच बीडमधील गुन्हेगारी चव्हाट्यावर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच दौरा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीडचे पालकमंत्री पदावर निवडण्यात आले असून त्यांचे निकटवर्तीय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशा सगळ्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने सर्वाधिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांच्याच मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यात मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीत. काल प्रसार माध्यमांशी बोलताना मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली होती. आपल्या डोळ्यांचे ऑपरेशन असल्यामुळे आपण फडणवीस यांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे मुंडे यांनी सांगितले होते. मात्र दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. बीड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यात पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक सर्व आमदार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित खुंटेफळ साठवण तलावाच्या शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी व बोगदा कामाचे भूमिपूजन, तसेच श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान (मायंबा) येथील समाधीमंदिराचे भूमिपूजन होणार आहे. खुंटेफळ येथील कार्यक्रम बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता, तर मायंबा येथील कार्यक्रम दुपारी अडीच वाजता पार पडणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. मच्छिंद्रनाथ समाधीमंदिराच्या नूतन इमारतीचे भूमिपजून मायंबा येथील आद्यनाथ मच्छिंद्रनाथ समाधीमंदिराच्या नूतन इमारतीचे भूमिपजून दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र नारायणगडाचे (बीड) महंत हभप शिवाजी महाराज हे असतील. या वेळी ह.भ.प. मधुकर महाराज शास्त्री (अश्वलिंग देवस्थान, पिंपळवंडी), गुरूवर्य अशोकनाथ पालवे महाराज (ओम शिव गोरक्षनाथ योगी आस्थाना, अहिल्यानगर), ह.भ.प. बबन महाराज बहीरवाल (मदन महाराज संस्थान, कडा), श्री. मस्तनाथ महाराज (नालेगांव, अहिल्यानगर), ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे (बंकटस्वामी महाराज संस्थान, नेकनूर) यांच्यासह राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, आष्टीचे माजी आमदार साहेबराव नाना दरेकर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. पाणी मिळण्याची प्रतीक्षा दरम्यान, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत आष्टी उपसा सिंचन क्रमांक 3 हा प्रकल्प खुंटेफळ प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या प्रकल्पातून आष्टी तालुक्याचे हक्काचे 1.68 टीएमसी पाणी मिळण्याची प्रतीक्षा आष्टीकरांना आहे. शिंपोरा ते खुंटेफळ या दरम्यान पाईपलाईनने हे पाणी आणले जाणार असून, या कामाची पाहणी मुख्यमंत्री फडणवीस व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच बोगदा कामाचे भूमिपूजनही यावेळी होणार आहे. त्यामुळे खुंटेफळ तलावाचे काम लवकरच मार्गी लागून हक्काच्या पाण्याची प्रतीक्षा संपण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.