काँग्रेसला आक्रमक प्रदेश अध्यक्षाची आवश्यकता:आपण देखील इच्छुक असल्याचे म्हणत माजी मंत्री नितीन राऊत यांचा दावा
आक्रमक विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू शकेल, असा नवीन प्रदेशाध्यक्षाची काँग्रेसला गरज असल्याचे काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर मला जर संधी दिली तर मला देखील प्रदेशाध्यक्ष बनायला आवडेल, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून नाना पटोले हे लवकरच पायउतार होणार आहेत. मला या पदातून मुक्त करावे, अशी मागणी त्यांनी पक्षातील श्रेष्ठींकडे केली होती. तर नवीन प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार? याबाबत चर्चा सुरू आहे. याच दरम्यान आता नितीन राऊत यांनी आपण या पदासाठी इच्छुक असल्याचे म्हटले आहे . काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला पदावरून मुक्त करण्याची विनंती पक्ष श्रेष्ठींकडे केली आहे. त्यामुळे पक्षाला मरगळ आली आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र असे म्हणता येणार नसल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. निष्ठावंत कार्यकर्ते अजूनही प्रामाणिकपणे पक्षाची सेवा करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सध्या नाना पटोले विधिमंडळ गटनेते पदाच्या भूमिकेत गेले आहेत. मात्र ते पद त्यांना मिळेल का? याबाबत पक्ष श्रेष्ठी निर्णय घेणार असल्याचे देखील राऊत यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कार्यकाळात काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो. नाना पटोले यांनी नुकताच या पदावरून राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र त्यांच्या राजीनाम्या बाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र काँग्रेसमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष पदावरून जोरदार चर्चा सुरू आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेक नेत्यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे. त्यातच या पदासाठी तरुण चेहऱ्याला पसंती दिली जाऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे. काँग्रेसला आक्रमक विरोधी पक्ष नेत्याची भूमिका पार पाडेल, असा नवीन प्रदेशाध्यक्ष पदाची गरज असल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे. त्यासाठी आपण देखील स्वतः तयार असल्याचे देखील त्यांनी बोलून दाखवले.