शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचा सेवाग्राम येथून होणार श्रीगणेशा:विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टीविटी वाढणार, डॉ. पंकज भोयर यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र स्थान असलेल्या सेवाग्रामच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. राज्य सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचा सेवाग्राम येथून श्रीगणेशा होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले. सेवाग्राम गावाची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. सेवाग्राम महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहली आहे. सेवाग्राम विकास आराखडयातंर्गत परिसराचा भाजप सरकारच्या काळात विकास झाल्यानंतर भाजप सरकारने सेवाग्रामला पुन्हा एक अनोखी भेट दिली आहे. नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाची सुरूवात वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले आहे. मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला मिळणार गती ८०२ किमीच्या या मार्गामुळे विदर्भ व मराठवाड्याची कनेक्टीविटी वाढणार असून या दोन्ही भागाच्या विकासासाठी मोलाचा दगड ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, अंबाजोगाईची योगेश्वरी माता आदी शक्तिपीठे एकमेकांशी जोडल्या जाणार आहे. परळी वैजनाथ, औंढा नागनाथ सह अन्य तीर्थस्थळे देखील मार्गाशी जोडली जाणार असल्याने हा महामार्ग पर्यटनासोबतच मराठवाडा व विदर्भाच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे. शक्तिपीठ महामार्ग १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. समृद्धी महामार्गाशी जिल्ह्याला जोडल्यानंतर आता शक्तिपीठ महामार्ग देखील जिल्ह्यातून जात असल्याने जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. प्रवाशांच्या वेळेची होणार बचत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गाचे बांधकाम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे भेट घेऊन त्यांचे आभार मानले. शक्तिपीठ महामार्ग आगामी काळात सर्वांना विश्वासात घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे मार्गावरील प्रमुख धार्मिक क्षेत्र व तीर्थस्थळे जोडण्यात येणार आहे. तसेच विकासाला गती मिळण्यासोबतच प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असा विश्वास पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी व्यक्त केला. सदर महामार्गाची प्रत्यक्ष सुरुवात जिल्ह्यातील सेवाग्राम येथून होणार असल्याने जिल्ह्यातील तसेच राज्याच्या आर्थिक विकासाला देखील चालना मिळणार असल्याचे पालकमंत्री भोयर म्हणाले.