शक्तिपीठ महामार्गाला माझाही विरोध:जे शेतकऱ्यांचे मत तेच माझे मत, अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

शक्तिपीठ महामार्गाला माझाही विरोध:जे शेतकऱ्यांचे मत तेच माझे मत, अशोक चव्हाण यांचे स्पष्टीकरण

शक्तिपीठ महामार्गाला माझाही विरोध, अशी प्रतिक्रिया भाजप नेते व खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे. शक्तिपीठ महामार्गाला जमिनी देण्यास नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यावर जे शेतकऱ्यांचे मत आहे, तेच माझे मत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. काय म्हणाले अशोक चव्हाण? अशोक चव्हाण म्हणाले, जे शेतकऱ्यांचे मत आहे तेच माझे मत आहे. दरम्यान यात काही पर्याय उपलब्ध आहेत का, हे पहावे लागेल. यातून काही मार्ग काढता येईल का ते बघू. याबाबत मी शेतकऱ्यांना भेटणार आहे, त्यानंतर मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सांगलीमधूनही शक्तिपीठ महामार्गाला विरोध ज्या पद्धतीने कोल्हापूरला यातून वगळले तसेच सांगली जिल्ह्याला सुद्धा वगळावे. ही सरकारला शेवटची विनंती आहे, अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला आहे. विशाल पाटील म्हणाले, आम्ही शक्तिपीठ महामार्गाला विरोध करत नाही. शक्तिपीठाला रत्नागिरी-नागपूर हा पर्यायी रस्ता आहे. याच रस्त्याला शक्तिपीठ जोडावेत. ज्या भागात शेतकरी जमिनी द्यायला तयार आहेत, त्या ठिकाणच्या जमिनी घ्याव्यात. तासगाव, मिरज या तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गास विरोध आहे. नियोजित शक्तीपीठ हा खरोखरच शक्तिपीठाला जोडणारा रस्ता आहे की दुसऱ्या हेतून निर्माण केलेला रस्ता आहे. कमी खर्चात जमीन अधिग्रहण करून त्यासाठी जास्त खर्च करण्यासाठी हा प्रकल्प आहे अशी शंका येते, असे विशाल पाटील म्हणाले आहेत. शक्तिपीठ महामार्गात कोणते देवस्थान असणार? कोल्हापूर – अंबाबाई, तुळजापूर – तुळजाभवानी. नांदेड – माहूरची रेणुका देवी या तीन शक्ती पीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ (नागेश्वर), माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपुरचे विठ्ठल रखुमाई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर या बारा देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment