शिवाजी महाराजांना एका समाजापुरतेच मर्यादित करू नका:अजित पवार यांची विनंती; म्हणाले- त्यांना सर्व समाज, धर्म, पंथाच्या लोकांनी साथ दिली

छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती आणि बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांनी कधीही जात, धर्मात भेदभाव केलेला नाही. त्यांचा एकंदरीत इतिहास पाहिला तर वेगवेगळ्या समाजातील, समाजाचे, धर्माचे, पंथाच्या लोकांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी महाराजांना मनापासून साथ दिलेली आहे. मात्र, काहीजण वेगळ्या पद्धतीने इतिहास लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करतात. कृपा करून महाराजांना एका समाजापुरतेच मर्यादित करू नका, महाराज सर्वांचे होते, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वढू बु. येथील महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. या नंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या एका समाजाचे नव्हते तर ते हिंदवी स्वराज्याचे होते. छत्रपती संभाजी महाराज यांना देखील पुढील काळामध्ये केवळ 9 वर्षे मिळाली. मात्र त्यांनी देखील अशाच पद्धतीने काम केले. त्यांची औरंगजेबाने भीती मनात घेतलेली होती. शौर्य कसे असावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे संभाजी महाराज होते. त्यावेळी वेगळ्या मार्गाने आपल्यातील लोकांनी फितुरी केली आणि त्यातून जो इतिहास घडला तो सर्वांपुढे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. फुले-शाहू-आंबेडकरांची यांची विचारधारा जशी आहे, ज्यात सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. त्याकरता सर्वांनी सहकार्य करावे, सर्वांनी साथ द्यावी, त्यातूनच राज्याचे भले होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. यातूनच कायदा व्यवस्था सुव्यवस्था महाराष्ट्र मध्ये चांगली राहण्यास मदत होईल, असे देखील अजित पवार म्हणाले. त्यातूनच राज्याचे भले होणार असल्याचेही ते म्हणाले. शिवाजी महाराज सर्वधर्मीय नसल्याचा संभाजी भिडे यांचा होता दावा छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजेंनी हिंदवी स्वराज्याचा विचार मांडला आहे, आपल्याकडील शिक्षक, प्राध्यापक, विचारवंत हे सर्व चुकीचा इतिहास मांडत आहेत, असे मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केले होते. पक्ष, संघटना शिवरायांच्या नावाचा स्वार्थासाठी वापर करत आहेत. खरे तर छत्रपती शहाजीराजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे या मताचे होते. त्यात त्यांना यश आले नाही, पण त्यांचा विचार पुढे आणला तो शिवरायांनी, असे देखील ते म्हणाले हेाते. संभाजी भिडे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी यांनी बलिदान दिले. सध्या छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली म्हणून बलिदान मास पाळला जात आहे. संभाजी भिडे म्हणाले की, शहाजीराजे म्हणाले होते की, मला स्वत:ला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे. मला स्वतंत्र राज्य निर्माण करायचे आहे. हिंदू… हिंदू… हिंदू समाज, हिंदू संस्कृती यांच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे आहे, असे म्हटले होते. संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी हा दावा केला आहे.