सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक:2000 सालच्या मानहानीच्या प्रकरणात कोर्टाचा परवा वॉरंट अन् आज कारवाई

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना 2000 सालच्या एका मानहानीच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांच्यावर दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांचा अवमान केल्याचा आरोप आहे. मेधा पाटकर या आपल्या ‘नर्मदा बचाओ’ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. त्यांनी 25 नोव्हेंबर 2000 रोजी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी व्ही के सक्सेना यांच्यावर गंभीर आरोप केला होता. सक्सेना एका बाजूला नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा देतात. पण दुसरीकडे त्यांची स्वयंसेवी संस्था गुजरात सरकारच्या सरदार सरोवर प्रकल्पाला पाठिंबा देते, असे त्या म्हणाल्या होत्या. सक्सेना यांनी नर्मदा बचाओ आंदोलन समितीला देणगी म्हणून दिलेला धनादेश वठला नसल्याचा आरोपही त्यांनी या प्रकरणी केला होता. गतवर्षी ठरवले होते कोर्टाने दोषी व्ही के सक्सेना यांनी या आरोपांनंतर त्यांच्याविरोधात अवमाननेचा दावा दाखल केला होता. गतवर्षी मे महिन्यात दंडाधिकारी कोर्टाने यासंबंधी मेधा पाटकर यांना अवमाननेसंबंधी दोषी घोषित केले होते. तसेच त्यांना 1 जुलै रोजी 5 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षाही सुनावली होती. पण अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 जुलै 2024 रोजी ही शिक्षा रद्दबातल करत त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर त्यांनी दिल्ली हायकोर्टात आपल्यावरील अटकेची संभाव्य कारवाई 2 आठवड्यांसाठी स्थगित करण्याची याचिका दाखल केली होती. या याचिकेत प्रोबेशन बाँडचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर हायकोर्टाने त्यांना सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. पण ऐनवेळी त्यांना प्रोबेशन बाँड दाखल करण्यात अपयश आल्यामुळे अखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने बुधवारी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली. आज त्यांना साकेत कोर्टात हजर केले जाणार आहे. कोण आहेत मेधा पाटकर? मेधा पाटकर या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या आणि पर्यावरणवादी आहेत. त्या आपल्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. सामाजिक न्याय, पर्यावरण संरक्षण आणि विस्थापितांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. नर्मदा खोऱ्यातील धरणांमुळे प्रभावित होणाऱ्या आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी आंदोलन उभारले. त्यांच्या कार्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, त्यांना राईट लाइव्हलीहूड अवॉर्डसह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मेधा पाटकर यांचे कार्य सामाजिक समानता आणि शाश्वत विकासासाठी प्रेरणादायी आहे. हे ही वाचा… कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा:अंतिम सुनावणीपर्यंत अटकेपासून अभय; चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा, पोलिसांना आदेश मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर