सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण:मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली, आंबेडकरांचा ‘दिव्य मराठी’च्या बातमीचा दाखला देत फडणवीसांवर निशाणा
सोमनाथ सूर्यवंशी मृत्युप्रकरणी वंचिज बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली व सभागृहाची दिशाभूल केली, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट करत ‘दिव्य मराठी’च्या बातमीचा दाखला दिला. गत 10 डिसेंबर रोजी परभणी शहरात एका माथेफिरूने संविधान प्रतिकृतीची तोडफोड केली होती. दुसऱ्या दिवशी या घटनेच्य निषेधार्थ परभणी बंदची हाक दिली होती. दरम्यान, शहरात दंगल झाली. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले. या ऑपरेशन दरम्यान सोमनाथला अटक केली. या दरम्यान सोमनाथचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसेच त्याच्या शरीरावरील जखमाही जुन्याच असल्याचे म्हटले होते. शवविच्छेदन अहवालातून मात्र मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले. याबाबत ‘दिव्य मराठी’ने आजच्या अंकात बातमी छापली आहे. याच बातमीचा दाखला देत आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांवर हल्ला चढवला. प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट जशास तशी
पोलिस मारहाणीत मणक्यावर घाव बसल्याने सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू!
ही आजच्या दिव्य मराठी दैनिकातील बातमी —
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी माहिती देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खोटी माहिती दिली व सभागृहाची दिशाभूल केली.
घाटी येथील शासकीय रुग्णालयात झालेल्या पोस्टमोटम रिपोर्टमध्ये सोमनाथ सुर्यवंशीच्या मणक्याला मार लागल्यामुळे मृत्यू झालाय, असा रिपोर्ट आहे.
ज्या पोलिसांनी सोमनाथला मारहाण केली, त्यांच्यावर मनुष्यवधाचा 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
राज्याचे मुख्यमंत्री सभागृहात जाहीरपणे खोटे बोलत असतील तर राज्याचे काय? मुख्यमंत्री म्हणाले होते, श्वसनाच्या आजारानेच मृत्यू
मुख्यमंत्री म्हणाले होते “मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरची कॉपी माझ्याकडे आहे. मॅजिस्ट्रेटने त्यांना दोनदा विचारलं होतं की, पोलिसांनी मारहाण केली का? सोमनाथने नाही असं म्हटलं होतं. कोठडीत असतानाचे व्हिडिओही आहेत. त्यात त्यांना मारहाण झालेली दिसत नाही. त्याच्या शरीरावरील जखमा जुन्या आहेत. शवविच्छेदन अहवालात श्वसनविकाराने सोमनाथचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे नमूद आहे!” हे ही वाचा… पोलिस मारहाणीत मणक्यावर घाव बसल्याने सोमनाथचा मृत्यू:मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले होते, मारहाणीमुळे नव्हे, तर श्वसनविकारामुळे मृत्यू; पण… पोलिसांच्या मारहाणीनंतरच्या जखमांमुळेच परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यृू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमनाथच्या घाटीत केलेल्या शवविच्छेदन अहवालाचे संपूर्ण तपशील ‘दिव्य मराठी’च्या हाती आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमनाथचा मृत्यू श्वसनाच्या विकाराने झाल्याचा दावा केला होता. शरीरावरील जखमाही जुन्याच असल्याचे म्हटले होते. अहवालातून मात्र मृत्यूचे खरे कारण स्पष्ट झाले. सविस्तर वाचा…