राज्यात ५ लाख २७ हजार असाक्षरांची नोंद:२३ मार्चला उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची मूल्यमापन चाचणी होणार

राज्यात ५ लाख २७ हजार असाक्षरांची नोंद:२३ मार्चला उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाची मूल्यमापन चाचणी होणार

केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे. राज्यात सद्यस्थितीत ५ लाख २७ हजार इतक्या असाक्षरांची नोंद उल्लास अॅपवर ऑनलाईन पध्दतीने करण्यात आलेली आहे. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात येईल. या परीक्षेतील प्रश्नपत्रिका ही पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याच्याशी संबंधित असून तीन भागांमध्ये विभागलेली एकूण १५० गुणांची असणार आहे. यामध्ये अनुक्रमे वाचन ५० गुण, लेखन ५० गुण, संख्याज्ञान ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक भागासाठी ३३ टक्के (१७ गुण) अनिवार्य आहेत व एकूण १५० गुणांपैकी ३३ टक्के (५१ गुण) अनिवार्य असतील. कोणत्याही एका भागाचे ३३ टक्के गुण होण्यासाठी कमी पडलेले जास्तीत जास्त ५ वाढीव गुण देता येतील. परंतु तीनही भागाचे मिळून ५ पेक्षा जास्त ग्रेस गुण देता येणार नाहीत. परीक्षेस जाताना एक आयकार्ड साईज फोटो, जन्मतारखेचा पुरावा म्हणून मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक इत्यादीपैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. असाक्षर व्यक्तींनी निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर २३ मार्च रोजी ओळखपत्रासह उपस्थित रहावे. नोंदणीकृत असाक्षर व्यक्तींना परीक्षा केंद्रावर उपस्थित ठेवण्यासाठी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, स्वयंसेवक यांनी आवश्यक ते सर्व प्रयत्न करावेत असे आवाहन राज्याचे शिक्षण संचालनालय (योजना), पुणे यांनी केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment