सुंभ जळाला तरी पीळ जात नाही:सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आणि महायुती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरू असून लवकरच यावर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपने शब्द दिला होता की नव्हता माहीत नाही, पण उद्धव ठाकरे 2019 साली हेच सांगत होते की शब्द दिला होता. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या, सुप्रिया सुळे या फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर आहेत. आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका. जेवढे निवडून आलेत तेवढे व्यवस्थित सांभाळा. जनतेने तुम्हाला का नाकारले आहे, यावर चिंतन करा. कारण सध्या तुमच अस झालय “सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही”, अशा शब्दात टीका केली आहे. काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन महायुती उभी राहिली आहे. त्याला यश मिळाले. त्यांचा चेहरा घेऊनच सगळे जनतेसमोर गेले होते. एकनाथ शिंदे यांना भाजपने कोणत्याही प्रकारचा शब्द दिला नव्हता, असे भाजपचे नेते म्हणत आहेत, शब्द दिला होता की नाही हे मला माहित नाही. पण 2019 साली उद्धव ठाकरे हेच सांगत होते की, मला शब्द दिला होता. दरम्यान, उद्या दिल्ली येथे महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे देखील याच बैठकीत ठरू शकते. एकनाथ शिंदे यांनी देखील आज पत्रकात्र परिषद घेत भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.