सुप्रिया सुळेंचा तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना फोन:काही मदत करू शकत असेल तर… कुटुंबीयांना दिला दिलासा
सुप्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका धारदार शस्त्राने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सैफ अली खान याला गंभीर दुखापत देखील झाली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमातून तातडीने सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना फोन केला. मी काही मदत करू शकत असेल तर मला सांगा, मी लगेचच मदत करेल, असा दिलासा सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना दिला आहे. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याला घरात घुसलेल्या चोराकडून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या मानेवर देखील खोल जखम झाली असून पाठीत खुपसलेल्या चाकूमुळे त्याची शस्त्रक्रिया देखील करावी लागत आहे. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे यांनी सैफ अली खान यांच्या कुटुंबीयांना हा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र सुप्रिया सुळे यांनी नेमका कोणाला फोन केला? याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही. प्रत्येकाच्या वैयक्तिक खासगी आयुष्याचा आदर केला पाहिजे
याबाबत सुप्रिया सुळे यांनी हा प्रकार धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आले असता त्यांनी याबाबत फार बोलण्यास नकार दिला. सैफ अली खान वरील हल्ला हा धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जी घटना घडली त्याबद्दल पोलिस आणि सैफ अली खान यांच्याकडून या धक्कादायक प्रकरणाची माहिती घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण प्रत्येकाच्या वैयक्तिक खासगी आयुष्याचा आदर केला पाहिजे, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मोघम प्रतिक्रिया दिली आहे. नेमके प्रकरण काय? बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला रात्री 3.30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी सांगतात की, सैफवर सहा वेळा वार करण्यात आले होते. त्यातील दोन जखमा खोल आहेत. पाठीच्या कण्याजवळ एक जखम आहे. तीन जणांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य कुठे होते याची माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. करिश्मा कपूरने 9 तासांपूर्वी इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. तिने बहीण करिना, मैत्रिण रिया आणि सोनम कपूरसोबत पार्टी केली. तिघींनी एकत्र जेवण केले. करिनाने बहीण करिश्माची ही पोस्ट तिच्या अकाउंटवर पुन्हा पोस्ट केली होती. सध्या मुंबई पोलिसांनी सैफच्या घरातून तीन जणांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात नेले आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा… मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे:खासदार वर्षा गायकवाड संतापल्या; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर फडणवीसांवर टीका महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अशा घटना वाढत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. या माध्यमातून वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईत हे सर्व सुरू असताना मुंबई पोलिस, आयुक्त आणि पोलिस महासंचालक काय काम करत आहेत? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. पूर्ण बातमी वाचा…