फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे:अज्ञात महिलेने रत्नागिरीहून गाठले संतोष देशमुखांचे घर, पोलिस येताच काढला पळ

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड तसेच इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. कृष्णा आंधळेचा शोध सुरू असतानाच मस्साजोग येथे देशमुख यांच्या घराच्या परिसरात एका अज्ञात महिलेने धाव घेतली होती. कृष्णा आंधळेचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावा या महिलेने केला होता. मात्र पोलिस दाखल झाल्यावर ही महिला बसमध्ये बसून पळून गेल्याचे समजले आहे. संतोष देशमुख यांच्या घरासमोर ही महिला आली होती. तसेच आपल्याला कृष्णा आंधळेबद्दल सगळे पुरावे माहीत आहेत. ही महिला रात्रभर देशमुख यांच्या घरासमोर असलेल्या मंडपात आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुख यांच्या घरातील बाथरूममध्ये आंघोळ करण्याचा हट्ट या महिलेने करण्यास सुरुवात केली. काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा पोलिस दाखल झाल्यावर या महिलेने येथून पळ काढला आहे. या संदर्भातील अधिकची माहिती अशी की, अज्ञात महिला शनिवारी सायंकाळी 6 वाजता देशमुख कुटुंबीयांच्या घरासमोरील मंडपात दाखल झाली होती. कृष्णा आंधळे माझ्यासोबत राहतो, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत असा दावा सुरूवातीला तिने केला. मात्र, पोलिस आल्यानंतर आपले नाव सांगण्यास देखील नकार दिला. सकाळी, अंघोळीसाठी तिने देशमुखांच्या घरातील बाथरूम वापरण्यासाठी द्यावे, अशी मागणी केली. दुसऱ्या बाथरूमची सोय करून दिल्यानंतरही देशमुखांच्या घरातीलच बाथरूममध्ये आपल्याला अंघोळ करायची, असा तिचा हट्ट होता. अखेर सकाळी केज पोलीस आल्यानंतर बसमध्ये बसून ती महिला निघून गेली. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया ही महिला रत्नागिरी जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिस या महिलेची माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या प्रसंगावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला कुटुंबीयांकडून सांगण्यात आले की, एक महिला घरी आलेली आहे, तिच्याकडून कृष्णा आंधळेबाबत काही पुरावे असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, आम्ही याबाबत गावकरी व पोलिसांना कळवले होते. तसेच, रत्नागिरी पोलिसांनाही आम्ही याबाबत माहिती दिली. तेव्हा रत्नागिरी पोलिसांनी देखील या महिलेने इथे तशाप्रकारच्या तक्रारी दिल्या आहेत. पण, आम्ही त्याची शहानिशा करत असल्याचे म्हटले आहे. पुढे बोलताना धनंजय देशमुख म्हणाले, सबंधित महिला आता निघून गेल्या आहेत. या महिलेने सकाळी अंघोळ करायचे म्हटल्यानंतर त्यांची इतरत्र सोय करण्यात आली. पण, त्यांनी आमच्या घरीच अंघोळ करायचा आग्रह केल्याने संशय निर्माण झाला. दरम्यान, रात्रभर त्या इथंच थांबलेल्या होत्या, त्यांच्या सोबतील महिला पोलिस कॉन्स्टेबलही होत्या, अशी माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे.