मुंबईतील मोर्चाकडे नेत्यांची पाठ:आमदार धस म्हणाले, माणसे कमी तरी भावना महत्त्वाची; फाशी होईपर्यंत समाजमन शांत होणार नाही
बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्यभरात मोर्चे काढण्यात येत आहे. यातीलच महत्त्वाचा मोर्चा मुंबईत काढण्यात आला. मात्र, या मोर्चाकडे अनेक नेत्यांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणात सातत्याने आवाज उठवणारे आमदार सुरेश धस देखील या मोर्चाला उशिरा पोहोचले. तोपर्यंत मोर्चाचा समारोप झाला होता. या संदर्भात सुरेश धस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मानसे कमी असले तरी या प्रकरणात समाजाची भावना महत्त्वाची असल्याचे धस यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशी होईपर्यंत समाज मन शांत होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणी काढण्यात आलेल्या मोर्चांमध्ये नेत्यांनी पाठ फिरवली असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, कधी कधी माणसे कमी येत असतात. मात्र, माणसे कमी किती आले यापेक्षा त्यांच्या आतील भावना लोकांपर्यंत गेल्या, यातच आमचे समाधान आहे. सरकारला खडबडून जागी करण्यासाठी या मोर्चाचा आयोजन करण्यात आले होते. मात्र, माणसे कमी आली यात काही आयोजकांच्या चुका असतील, मेगाब्लॉक असेल किंवा इतर अनेक कारणे असतील. कारण काहीही असो, जनतेच्या भावना सर्वांसमोर पोहोचणे महत्त्वाचे असल्याचे धस यांनी म्हटले आहे. या संदर्भात आमदार सुरेश धस म्हणाले की, जनतेच्या मनाला लागलेले हे प्रकरण आहे. हा 14 कोटी जनतेच्या मनातील राग आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल, तेव्हाच समाजमन शांत होईल. तोपर्यंत कोणालाही समाधान लागणार नसल्याचे धस यांनी म्हटले आहे. सात तासांचा प्रवास करून मी या ठिकाणी पोहोचलो आहे. मी फ्रेश होण्यासाठी गेलो होतो. मात्र, मी परत आलो तेवढ्या वेळात कार्यक्रम संपला होता. मात्र त्यात गैर काहीही नाही. मी माध्यमांच्या माध्यमातून माझी मागणी सर्वांपर्यंत पोहोचवली असल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. महादेव मुंडे यांच्या मुलाच्या डोळ्यातील पाणी दिसले नाही का? पंधरा महिन्यानंतर महादेव मुंडे यांच्या हत्याचा आरोपी सापडत नाही, यावर आमदार सुरेश धस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाच्या डोळ्यातील पाणी तुम्हाला दिसले नाही का? ज्या मुलाचा बाप गेला आणि पंधरा महिन्यापर्यंत त्या मुलाच्या वडिलांचा खून कोणी केला? याचा तपास लागत नाही, ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. यावरून आकाचा किती प्रभाव तेथील पोलिसांवर होता हे दिसते. भास्कर केंद्रे सारखा एक पोलिस अधिकारी पंधरा वर्षापासून एकाच पोलिस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्ये कसा राहतो? हे देखील गौडबंगाल त्यातून पुढे येणार असल्याचे धस यांनी म्हटले आहे. हस्तांतरित मालमत्ता देखील जप्त करा संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाची संपत्ती ताब्यात घेतल्याशिवाय या लोकांचे धागेदोरे समोर येणार नाही. संपती जप्त केल्याची मागणी मी सर्वात आधी केली होती, असा दावा देखील सुरेश धस यांनी केली आहे. तर केवळ आकाच नाही तर आकाचे आका, सखा, टका असे अनेक लोकांच्या नावावर मालमत्ता आहेत. इतकेच नाही तर या काळात त्याच्या काही मालमत्ता या दुसऱ्यांच्या नावावर हस्तांतरित करण्याचे चालू आहे. या कालावधीत हस्तांतरित झालेल्या मालमत्ता देखील जप्त करायला हव्या, अशी आमची सर्वांची मागणी असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे.