धर्माचा आणि पैशांचा उपयोग केला गेला:राज्यातील निकाल धक्कादायक, बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया
संगमनेर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचे नेते व उमेदवार बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अमोल खताळ यांचा या मतदारसंघात विजयी झाले आहेत. अमोल खताळ हे भाजप पक्षातून शिवसेना शिंदे गटात गेले होते व तिथून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. विशेष म्हणजे बाळासाहेब थोरात यांचा नवख्या अमोल खताळ यांनी हा पराभव केला आहे. त्यामुळे कॉंग्रेस व थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यातील हे निकाल धक्कादायक आहेत. या निकालामुळे जन सामान्य जनतेच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. धर्माचा आणि पैशांचा उपयोग केला गेला, असा आरोप थोरात यांनी केला आहे. लाडकी बहीण योजना फक्त राजकारणासाठी वापरल्या गेल्या आहेत, असेही थोरात म्हणाले. महायुतीला मिळालेल्या जागा हे त्यांचे यश नाही, ओढून ताणून युक्त्या करून महायुतीने यश मिळवले आहे. ज्या साधनांचा वापर भाजप करत आहे त्यामुळे लोकशाहीला मोठा धोका निर्माण होणार असल्याचे देखील बाळसाहेब थोरात म्हणाले आहेत. वेगळा दर्जा भाजपने निर्माण केला आहे. पुढील काळात लोकशाही कुठे जाईल, याची काळजी वाटणारी ही निवडणूक आहे, असे थोरात म्हणाले. नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे अशा काँग्रेसच्या दिग्गजांना मतदारांनी धक्का दिला आहे. राज्यात आमचीच सत्ता येईल, तसेच काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल, असा दावा करणारे दिग्गज नेते स्वत:चाच मतदार संघ वाचवू शकले नाहीत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचा हा मोठा पराभव मानला जात आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. सत्ता स्थापनेचा दावा करणारे काँग्रेसवर आता अनेक मतदारसंघातील महत्त्वाचे नेते गमावण्याची नामुष्की ओढावली आहे. इतकेच नाही तर काँग्रेस मधून मुख्यमंत्री पदाचा दावा ठोकणाऱ्या प्रमुख नेत्यांचा देखील पराभव झाला आहे. त्यातही ज्या नेत्यांचा विजय झाला, तो देखील अवघ्या काही मतांनी निसटचा विजय मिळाला असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे काँग्रेसचा राज्यात सुपडा साफ झाला असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.