तिच्यावरच घरातील सगळे प्रेम करतात:5 वर्षीय बहिणीला 13 वर्षांच्या भावाने संपवले, गळा दाबून व डोक्यात दगड घालून केला खून

तिच्यावरच घरातील सगळे प्रेम करतात:5 वर्षीय बहिणीला 13 वर्षांच्या भावाने संपवले, गळा दाबून व डोक्यात दगड घालून केला खून

मुंबई येथील नालासोपारा येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 5 वर्षीय चिमुकलीची तिच्याच 13 वर्षीय आत्येभावाने खून केल्याची घटना समोर आली आहे. आपल्या लहान बहिणीवरच घरातील सगळे प्रेम करतात, या इर्षेपोटी ही हत्या करण्यात आल्याचे समजते. 13 वर्षीय भावाने आपल्या 5 वर्षीय चिमुकल्या बहिणीचा गळा दाबून व डोक्यात दगड घालून हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान यांनी फिर्याद दिली आहे. अधिकची माहिती अशी की, मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान (वय 33) हे नालासोपारा येथील श्रीराम नगर येथे राहतात. त्यांना दोन मुली असून, त्यांची धाकटी मुलगी शिद्राखातून ही 5 वर्षांची होती. शनिवारी शाळेतून घरी आल्यानंतर सायंकाळी बाहेर खेळत असताना अचानक बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. सर्वत्र शोधाशोध करून अखेर परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता खान यांचा 13 वर्षीय भाचा शिद्राखातून हीला घेऊन जाताना दिसला. त्याला या प्रकरणी विचारले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी शिद्राखातूनची हत्या केल्याची खोटी माहिती दिली. कुटुंबीयांनी थेट रात्री साडेअकराच्या सुमारास पेल्हार पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता त्यांना शिद्राखातून हिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी 13 वर्षीय भाच्याची चौकशी केली असता, त्याच्या जबाबात विसंगती आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संपूर्ण कुटुंब शिद्राखातूनवर विशेष प्रेम करत होते. तिच्यावर होणारा लाड बघवत नसल्याने आरोपी भावाने तीचा डोंगरात नेऊन गळा दाबला आणि त्यानंतर डोक्यात दगड घालून तिचा जीव घेतला, असे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले असून, सोमवारी त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाणार आहे. पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी ही माहिती दिली. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment