त्या दिवशी काय राहू-केतू झाला माहीत नाही:डॉ. केळकरांच्या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मूलनचा आक्षेप, अशास्त्रीय दावा केल्याचा आरोप

त्या दिवशी काय राहू-केतू झाला माहीत नाही:डॉ. केळकरांच्या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मूलनचा आक्षेप, अशास्त्रीय दावा केल्याचा आरोप

पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अनामत रक्कम मागितल्याचा तसेच पैशांच्या अभावी गर्भवती महिलेवर उपचार न केल्याने मृत्यूचा आरोप केला जात आहे. तसेच या रुग्णालयात काम करणारे डॉ. घैसास यांच्यावर देखील टीका केली जात आहे. डॉ. घैसास यांनी या प्रकरणानंतर तसेच जयंतेच्या संतापानंतर राजीनामा दिला आहे. या सगळ्या घटनांवर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले होते. यावेळी बोलताना त्यांनी आम्ही डिपॉझिट घेत नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्या दिवशी काय राहू केतू झाला आणि अनामत रक्कम मागितली माहिती नाही, असे विधान त्यांनी केले होते. यावर आता अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने आक्षेप घेतला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. केळकर म्हणाले होते, आम्ही कधीही फॉर्मवर डिपॉझिट असे लिहीत नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असे केले नव्हते. पण त्यादिवशी राहू केतू डोक्यात काय आले आणि या लोकांनी डिपॉझिट लिहून दिले काय माहित नाही. त्यांच्या या विधानावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने आक्षेप घेतला आहे. तसेच असा अशास्त्रीय दावा केल्यासंबंधी डॉ. केळकर आणि डॉ. घैसास यांची उपचार, निदान करण्यासंबंधीची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रद्द करावी, अशी मागणी देखील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप काय? कोणताही शास्त्रीय आणि व्यवहारिक आधार नसलेल्या ज्योतिषात राहू, केतू हे दोन ग्रह मानले आहेत. मात्र खगोलशास्त्रामध्ये राहू, केतूला ग्रह म्हणून मान्यता नाही. खरे तर कोणतेही ग्रह हे पृथ्वीवरील मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत, हे शास्त्रीय पद्धतीने स्पष्ट झालेले आहे. रुग्णालयाचे जबाबदार म्हणून डॉ. धनंजय केळकर यांनी केलेला दावा हा डॉ. सुश्रुत घैसास यांच्याकडून माहिती घेऊनच केलेला असणार आहे. त्यामुळे विज्ञान शाखेचे असणारे डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. सुश्रुत घैसास यांना ग्रहांसंबंधी शास्त्रीय माहिती नसणे हे अत्यंत धक्कादायक आहे, असे अंधश्रद्धा निर्मूलनतर्फे म्हटले आहे. पुढे असे म्हटले की, स्वतःच्या चुकांची जबाबदारी झटकून त्या चुका राहू आणि केतूच्या माथी मारणे, यामागे चालूगिरी, कावेबाजपणा आणि धूर्तपणा आहे. भविष्यात एखाद्या रुग्णावर निदान, उपचार करत असताना रुग्णालय आणि डॉक्टरांकडून एखाद्या रुग्णावर विपरीत परिणाम झाले अथवा एखादा रुग्ण दगावला तर हे रुग्णालय आणि डॉक्टर हे सदर गोष्ट ही शनी, मंगळ अथवा राहू, केतूमुळे घडल्याचे सांगून हात वर करणार असल्याचे दिसते. आणि मग सदर चुकीसंबंधी न्यायालयाने नक्की शनी, मंगळ, राहू,केतूला शिक्षा ठोठावायची का? असा प्रश्न पडतो. डॉ. धनंजय केळकर यांनी केलेल्या बेकायदेशीर अशास्त्रीय आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचे समर्थन घडले आहे. उद्या वैद्यकशास्त्रातील इतर लोकही स्वतःच्या चुकांचे खापर हे राहू, केतुवर फोडून मोकळे होतील. तसेच यामुळे असे अशास्त्रीय दावा केल्यासंबंधी डॉ. धनंजय केळकर आणि डॉ. सुश्रुत घैसास यांची उपचार, निदान करण्यासंबंधीची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रद्द करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment