उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडल्यावर तिथे टोपलीभर लिंबू सापडले:काळी जादू काय असते त्यांनाच विचारा, रामदास कदम यांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबू सापडले होते, तसे एकनाथ शिंदे यांनीच मला सांगितले होते, असे म्हणत शिवसेना नेते रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाही, याचे उत्तर काळ्या जादूवल्याने द्यावे, माझ्या नादाला लागू नका, असा इशारा ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिला आहे. यावर प्रत्युत्तर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले आहे. रामदास कदम म्हणाले, काळ्या जादूबद्दल बोलू नका. काळी जादू काय असते हे उद्धव ठाकरे यांनाच विचारा. उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला तेव्हा बंगल्यावर टोपलीभर लिंबू सापडले होते, असे एकनाथ शिंदे यांनीच सांगितले होते. उद्धव ठाकरे बुके घेऊन फडणवीस यांना भेटायला जातात. आणि दुसऱ्या बाजूला अमित शाह यांना अफजल खान म्हणतात. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद कसे निर्माण होतील हा त्यांचा हेतू आहेत. रामदास कदम यांनी यांनी दैनिक सामनातून करण्यात आलेल्या टीकेचाही समाचार घेतला. काही लोकांना ऐकायला येत नसेल. काही लोकांचे डोळे बंद असतील, काहींचे कान बंद असतील. झोपलेल्यांना जागे करू शकतो. पण झोपण्याचे सोंग घेतलेल्यांना जागे करू शकत नाही. सामनातील बातम्या झोपेचे सोंग घेऊन केलेल्या बातम्या आहेत. त्यात तथ्य नाही. शिवसेना कधीच फुटणार नाही. प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघात कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी गेला आहे. पुन्हा आमदार निवडून आणले आहेत. सर्व आमदार एकनाथ शिंदेच्या पाठी खंबीर उभे आहेत. कुठेही मतभेद नाहीत, असेही रामदास कदम म्हणाले. मंत्री उदय सामंत यांच्याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, उदय सामंत चांगले काम करत आहेत. माझ्या लहान भावासारखे आहेत. एकनाथ शिंदेंच्या भावासारखे आहेत. शिंदेंच्या पाठी खंबीर आहेत. एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी म्हणून उदय सामंत यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यात मीठ टाकण्याचा प्रयत्न होत आहे. त्याला आम्ही भीक घालत नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद कसे होतील हेच ठाकरे गट पाहत आहे. त्यांचे 20 आमदार राहतील की नाही अशी परिस्थिती आहे. आमदारांना कसे थांबवावे हेच पाहत आहे.