वाल्मीक कराडला आज न्यायालयात हजर करण्यात येणार:पोलिसांना ठोस पुरावा मिळाल्याने कारवाईला वेग येण्याचा अंदाज
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मीक कराड याची सीआयडी कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी व्हीसीद्वारे सुनावणी घेण्याचे तयारी केली आहे. मात्र आता त्याला पुन्हा सीआयडी कोठडी मिळते की, न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी केली जाते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी अटक असलेल्या आरोपींचा मुख्य सूत्रधार हा वाल्मीक कराडच असल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचे आणि आरोपींचे असलेले संबंध आणि या प्रकरणातील त्याचा हात, याचा तपास करण्यासाठी सीआयडी पथकाने वाल्मीक कराडच्या सीआयडी कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याला सात दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यानुसार आज त्याची कोठडी पूर्ण होत असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावण्यात आल्यानंतर 15 जानेवारी रोजी वाल्मीक कराड याला बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आल्यानंतर न्यायालयाने तपासासाठी त्याला सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली होती. ही कोठडी आज संपणार आहे. आज त्याला विशेष जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव व्हीसीद्वारे ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात आरोप होत असलेला वाल्मी कराड याने 31 डिसेंबर 2024 रोजी शरणागती पत्करून आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितली त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. संतोष देशमुख हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपी या सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे काही पोलिस अधिकारीही त्यांच्यासोबत दिसत आहेत. हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा मानले जात आहे. पीएसआय राजेश पाटील देखील आरोपींसोबत मिळालेल्या माहितीनुसार, हे सीसीटीव्ही फुटेज केज शहरातील विष्णू चाटे याच्या कार्यालयासमोरील दुकानाबाहेरील आहे. आवादा कंपनीला 29 नोव्हेंबर 2024 रोजी खंडणी मागितली होती. तत्पूर्वी विष्णू चाटे याच्या कार्यालयात बैठक झाली. त्याच दिवशीचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासोबत संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले यांसह त्याचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हे देखील यावेळी आरोपींसोबत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मीक कराड केज शहरात वाल्मिक कराड याने विष्णू चाटेटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा समजला जात आहे. 29 नोव्हेंबर 2024 रोजीचा सकाळी अकरा वाजताचा हा व्हिडिओ आहे. यानंतर आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार घडला असल्याचा संशय आहे. 29 नोव्हेंबरला वाल्मीक कराड केज शहरात होता, याचा हा पुरावा देखील आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणातील काही आरोपी यामध्ये दिसत आहेत. त्यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. हत्येच्या दिवशी आरोपींची फोनाफोनी संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. सर्व आरोपी आता कोठडीमध्ये असून या प्रकरणाचा एसआयटी तपास करत आहे. कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी अद्याप फरार आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्यादिवशी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि वाल्मीक कराड यांच्यात फोनवर संभाषण झाल्याचा दावा पोलिसांनी कोर्टात केला होता. संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि आरोपींची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती असल्याचेही पोलिसांनी कोर्टात म्हटले होते. दरम्यान, आता वाल्मीक कराडविरोधात पोलिसांना ठोस पुरावा मिळाल्याने कारवाईला वेग येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकेतील आरोपी
1. जयराम चाटे (हत्या प्रकरण)
2. महेश केदार (हत्या प्रकरण)
3. प्रतीक घुले (हत्या प्रकरण)
4. विष्णू चाटे (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
5. सुदर्शन घुले (हत्या प्रकरण) (खंडणी प्रकरण)
5. सुधीर सांगळे (हत्या प्रकरण)
8. वाल्मिक कराड (खंडणी प्रकरण) फरार आरोपी
1. कृष्णा आंधळे (हत्या प्रकरण)