‘वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये जादूटोणा’:कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरले; खासदार संजय राऊत यांचा अजब दावा
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या वर्षा बंगल्याच्या परिसरामध्ये जादूटोणा केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या बंगला परिसरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्याची शिंग पुरले असल्याचा चर्चा सुरू आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या अजब दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांचे अधिकृत निवासस्थान हे मलबार हिल परिसरातील वर्ष हा बंगला आहे. त्यामुळे वर्षा हा बंगला कायमच चर्चेत असतो. मात्र, उपमुख्यमंत्री पदावरुन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री पदाचे उपमुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी अद्याप वर्षा बंगल्यात संदर्भात काहीही निर्णय घेतलेला नाही. वास्तविक मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला जातील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र एकनाथ शिंदे यांनी अद्याप वर्षा बंगला सोडलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी हे आरोप केला आहेत. संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वर्षा बंगल्याबाबत अत्यंत स्फोटक असा दावा केला आहे. वर्षा बंगल्याच्या बाहेरच्या लॉन मध्ये गुवाहाटीच्या कामाख्या मंदिरात बळी देण्यात आलेल्या रेड्याचे शिंग आणून पुरले आहेत. मात्र आम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही. वर्षा बंगल्यातील कर्मचारी वर्गात अशी कुजबूत रंगली असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. कामाख्या मंदिरातून आणलेली रेड्याची ही शिंग मंतरलेली आहेत. जो कोणी दुसरा मुख्यमंत्री होईल, त्याचे मुख्यमंत्री पद टिकू नये त्यामुळेच हे करण्यात आले असल्याचे देखील राऊत यांनी म्हटले आहे. याच कारणामुळे देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला जायला तयार नाहीत. तर ते केवळ मुख्यमंत्री म्हणून काम करत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आम्ही अंधश्रद्धा मारत नाहीत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याला महात्मा फुले यांच्यापासून ते संत गाडगेबाबा, प्रबोधनकर ठाकरे यांच्या पर्यंतची परंपरा लाभली आहे. त्यामुळे या राज्यातून अंगारे आणि धुपारे तसेच अंधश्रद्धा हद्दपार झाली असल्याचे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे. लाडके मुख्यमंत्री तिकडे राहायला का जात नाही? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अद्याप वर्षा बंगल्यावर राहयला का गेले नाही? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन इतके दिवस झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर ते राहायला का जात नाही? हा आमचा प्रश्न आहे, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान हे राज्याच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा विषय आहे. आमचे लाडके मुख्यमंत्री तिकडे राहायला का जात नाही? वर्षा बंगल्यावर राहायला गेलो की, रात्री झोपायला जाणार नाही. त्यामुळे राज्यातील लिंबू सम्राटानेच याचे उत्तर द्यावे. शिंदे गटात असे अनेक लिंबू सम्राट असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.