विद्यार्थ्यांनी केली वाईट सवयींची होळी:नागपूर मनपा शाळेतील मुलांनी पंधरा दुर्गुणांचे केले दहन, शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुक

नागपूर महानगरपालिकेच्या प्रियदर्शिनी मराठी उच्च प्राथमिक शाळा फुटाळा येथे एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी दुर्गुणांची होळी साजरी करून आपल्यातील वाईट सवयी सोडण्याचा संकल्प केला. मुख्याध्यापिका डॉ. वसुधा वैद्य यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी खोटे बोलणे, चोरी करणे, आज्ञा न पाळणे, मोबाईलवर घातक खेळ खेळणे, स्वच्छता न राखणे, मारामारी करणे, शिव्या देणे अशा पंधरा दुर्गुणांची यादी तयार केली. प्रत्येक विद्यार्थ्याने या दुर्गुणांना कागदावर लिहून होळीत टाकले. ‘होळी रे होळी दुर्गुणांची होळी’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी या दुर्गुणांचे दहन केले. यानंतर फुलांची उधळण आणि एकमेकांना गुलाल लावून होळीचा सण साजरा करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व शिक्षणाधिकारी साधना सयाम यांनी विशेष कौतुक केले.