विजय वडेट्टीवारांवर देशद्रोहाचे कलम लावा:नीतेश राणे यांची मागणी; शिंदे गटाचे नेते तथा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही केली टीका

भाजपचे नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. विजय वडेट्टीवार यांची मानसिकता तुष्टीकरण व हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत. विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना पहलगाम हल्ल्यावरून एक वादग्रस्त विधान केले होते. ‘पहलगाम हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून लोकांना ठार मारले असा दावा केला जात आहे. पण असे विचारण्यासाठी त्यांच्याकडे वेळ असतो का? दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे विविध प्रश्न त्यांनी याविीषयी उपस्थित केले होते. काय म्हणाले मंत्री नीतेश राणे? मंत्री नीतेश राणे यांनी त्यांच्या या विधानावर संताप व्यक्त करताना त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावण्याची मागणी केली. काँग्रेसने काही वर्षांपूर्वी भगवा आतंकवाद असा उल्लेख केला होता. त्यामुळे वडेट्टीवार दहशतवादाला रंग नाही असे विधान कसे काय करू शकतात? त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची विधाने ऐकावी. त्यांची मानसिकता ही तुष्टीकरण व हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचे कलम लावावे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांचीही वडेट्टीवारांवर टीका उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला होता. अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे लोक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आत्ता नातेवाईकांच्या म्हणणे माध्यमांनी जाहीरपणे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अतिरेक्यांनी धर्म विचारून मारले. त्यामुळे वडेट्टीवारांनी असे विधान करू नये. ते तिथे घटनास्थळी होते का? इथे बसून अशी विधान करणे हे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे? हे मला समजत नाही. माझ्याकडे यासाठी शब्द नाहीत, असे ते म्हणाले. राणेंचा योगेश कदम यांच्यावरही निशाणा दुसरीकडे, नीतेश राणे यांनी दापोली येथे दोन गटात झालेल्या वादाच्या मुद्यावरून महायुतीमधील घटकपक्ष असणाऱ्या शिवसेनेचे नेते तथा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही निशाणा साधला. योगेश कदम माझे मित्र आहेत. त्यांनी दुसऱ्यावर जाणारा बाण आपल्या अंगावर का घेतला? हे मला ठावूक नाही. पण आपले सरकार हिंदुत्त्ववादी आहे. जेव्हा दंगली घडली तेव्हा विटा व दगड कुणी मारले? याविरोधात आपण हिंदू म्हणून ठोस भूमिका घ्यायला हवी. पक्षाच्या चौकटीत राहू नये. हिंदू म्हणून एकत्र येताना खांद्याला खांदा लावून लढण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा… दहशतवाद्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का?:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचे वादग्रस्त वक्तव्य; पवार, देशमुख, वाड्रांनंतर बोलले! मुंबई – दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे आहे की, कोणाच्या कानात जाऊन तुमचा धर्म कोणता आहे? असे ते विचारतील का, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. शरद पवार, अनिल देशमुख आणि रॉबर्ट वाड्रानंतर विजय वडेट्टीवार यांचे हे वक्तव्य आले आहे. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पहलगाम हल्ला प्रकरणी काही पर्यटक सांगत आहेत की दहशतवाद्यांनी गोळ्या झाडण्यापूर्वी लोकांना धर्म विचारला, तर काहीजण सांगतायत की असे काही घडलेच नाही. मुळात दहशतवाद्याला धर्म किंवा कुठलीही जात नसते, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. वाचा सविस्तर