साताऱ्यातील कास अन् कोयना खोरं व्हायटी फुलांनी बहरलं:8 वर्षातून एकदा येतात ही फुलं, काय आहे वैशिष्ट्य?

साताऱ्यातील कास अन् कोयना खोरं व्हायटी फुलांनी बहरलं:8 वर्षातून एकदा येतात ही फुलं, काय आहे वैशिष्ट्य?

जागतिक वारसास्थळाचं कोंदण लाभलेल्या कास पठारासह कांदाटी, कोयना खोऱ्यात सध्या व्हायटी फुलांचा अविष्कार पाहायला मिळत आहे. व्हायटी वनस्पतीला आठ वर्षातून एकदाच ही फुले येतात. त्यामुळं वनस्पती अभ्यासक आणि मधमाशी पालनासाठी मोठी पर्वणी ठरली आहे. व्हायटी वनस्पती ही पश्चिम घाटातील सह्याद्रीच्या खोऱ्यात आढळून येणारी झुडुप वर्गातील वनस्पती आहे. या वनस्पतीचं शास्त्रीय नाव ( Thelepaepale ixiocephala Family-Acanthaceae) आहे. या वनस्पतीची उंची ५ फूट असते. आठ वर्षातून एकदा या वनस्पतीला फुलं येतात. ती पांढरी शुभ्र असतात. फुलोरी, सातेरी, आग्या, मेलिफेरा, ट्रायगोना, अशा सर्व प्रकारच्या मधमाशा व्हायटी फुलांमधून मध आणि पराग गोळा करतात. व्हायटी वनस्पतीला नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान फुलोरा येतो. परंतु सह्याद्री घाटमाथा परिसरात हा फुलोरा जानेवारीपर्यंत टिकणार असल्याचं वनस्पती अभ्यासकांचं म्हणणं आहे. कास परिसरातील अंधारी, फळणी, उंबरी, घाटाई मंदिर, मुनावळे, कास, कोयना खोऱ्यातील रेणोशी, खरोशी, रूळे, शिरनार, दाभेमोहन, कोट्रोशी आणि कांदाटी खोऱ्यातील गावढोशी, वाळणे, आवळण, आरव, निवळी, आकल्पे, दरे तांब, पिंपरी, लामज, उचाट, वाघावळे, वलवण, पर्वत, सालोशी ही गावं सध्या व्हायटी फुलांनी बहरली आहेत. व्हायटी मधाचा रंग पांढरा, पिवळसर असतो. व्हायटी मधातील ग्लुकोजमुळं थंडीत मधाचे कणीभवन २० ते ३० दिवसांत होते. पांढरा, पिवळसर रवाळ मध टोस्ट, ब्रेड तसेच चपातीबरोबर खाल्ला जातो. हा मध बहुगुणी औषधी असून या मधाला मोठी मागणी असते. हा मध बलवर्धक असल्यानं अशक्तपणा दूर करण्यासाठी तसेच स्नायूंना बळकटी आणण्यासाठी वापरतात. महाबळेश्वर येथील मध संचालनालयाचे माजी संचालक दिग्विजय पाटील यांनी मधपाल आणि विद्यार्थ्यांना आवाहन केलंय की, मध संचालनालयाकडून मेणपत्रा खरेदी करावा. मधुकोटी फ्रेम्सला लावून मधाची पोळी ओढून घ्यावीत. जुनी खराब झालेली मधुपोळी गाळून घेवून त्याचे मेण तयार करावे. रिकाम्या फ्रेम्सना मेणपत्रा लावून नवीन पोळी तयार करावीत. कमी मधमाशा असणाऱ्या कमजोर मध वसाहती मजबूत कराव्यात. तसंच वनस्पतीशास्त्राच्च्या विद्यार्थ्यांनी व्हायटी मधाच्या परागाचे संकलन आणि पराग पृथःकरण करावं.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment