युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण?:महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये नवा वाद; केंद्रीय समितीच्या मान्यतेविना केलेल्या नियुक्त्या 8 तासांत रद्द

युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण?:महाराष्ट्र युवक काँग्रेसमध्ये नवा वाद; केंद्रीय समितीच्या मान्यतेविना केलेल्या नियुक्त्या 8 तासांत रद्द

युवक काँग्रेसलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. प्रदेश शाखेच्या नव्याने करण्यात आलेल्या सर्व नियुक्त्या अखिल भारतीय युवक काँग्रेसने अवघ्या ८ तासांमध्ये रद्द केल्या. राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी रात्री १२ वाजता नवीन नियुक्त्यांची यादी अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुपवर जाहीर केली. मात्र, भारतीय युवक काँग्रेसच्या दिल्ली मुख्यालयाने सकाळीच या नियुक्त्या रद्द केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले की, नियुक्त्या कोणत्याही अधिकृत मंजुरीशिवाय केल्या गेल्याने त्या अवैध ठरविण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिला. या मध्ये २० प्रदेश उपाध्यक्ष, ८ कार्याध्यक्ष व अन्य अनेक नियुक्त्या होत्या. या घटनेनंतर प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आता कोणामागे रहायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे विद्यमान प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत व अखिल भारतीय युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यातील मतभेद यातून उघड झाले. केंद्रीय समितीच्या नियमांप्रमाणे प्रदेशाध्यक्षांसह कोणालाही कसलीही नियुक्ती करायची असेल तर त्यासाठी केंद्रीय समितीची मान्यता लागते. राऊत यांनी अशी कोणताही मान्यता घेतली नव्हती. त्यामुळे केंद्रीय समितीने तातडीने दिल्लीहून पत्रक प्रसिद्ध करून फक्त ८ तासांमध्ये या सर्व नियुक्त्या रद्द करून टाकल्या. केंद्रीय समितीमध्ये राष्ट्रीय सचिव असलेल्या अजय चिंकारा,एहसान खान, कुमार रोहित यांच्या या पत्रकावर स्वाक्षऱ्या आहेत. याच पत्रकात त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय कोणाचीही नियुक्ती करणे ही गंभीर व शिस्तभंग करणारी गोष्ट आहे असे म्हटले आहे. तसेच ज्यांनी कोणी या नियुक्त्या केल्या, त्याचा शोध घेऊन संबधितांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment