खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट:सरपंच देशमुख खून प्रकरणी तिसरा आरोपी अटकेत; कुटूंबीयांना माजलगावकरांचा मदतीचा हात

खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट:सरपंच देशमुख खून प्रकरणी तिसरा आरोपी अटकेत; कुटूंबीयांना माजलगावकरांचा मदतीचा हात

बीड येथील केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करत खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यावर राज्यभरात याचे पडसाद उमटले. येथील ग्रामस्थांनी रोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन देखील केले. यावेळी मराठा नेते मनोज जरांगे हे देखील उपस्थित होते. तसेच बीड जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीबद्दल चर्चा करण्यासाठी तसेच संतोष देशमुख मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली. दरम्यान या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले असल्याची माहिती समोर आली आहे. खून, मारामाऱ्या आणि अपहरणाच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असे असताना पोलीस निपक्षपातीपणे कारवाई करायचे सोडून अशासकिय लोकांच्या दबावात काम करत आहेत. यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला असून जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणांच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, या मागणीसाठी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले. दिल्ली येथे दि.११ डिसेंबर रोजी खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. जिल्ह्यात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबत शहा यांना पत्र दिले असून पत्रात म्हटले आहे, बीड जिल्ह्यात गेल्या पाच-सहा वर्षामध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे. कोणत्याही प्रकरणात अशासकीय लोकांचा हस्तक्षेप होत असल्याने पोलिस यंत्रणा हातचे बाहूले बनून काम करत आहे. अर्थातच पोलिस निपक्षपातीपणे काम करत नाहीत. परिणामी, जिल्ह्यात वाळूमाफिया, भुमाफिया, गुटखा माफिया, खंडणी, खून, अवैध शस्त्रांचा व्यापार फोफावत आहे. परळीत अमोल डुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्यात आली. यानंतर त्यांना अंधाऱ्या रात्री घाटात सोडून दिले. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणात खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून हत्या केली. संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे कळताच मी जिल्हा पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांना सलग फोन केले. मॅसेजेस केले परंतु संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला. पोलिस अधिक्षक यांचा संपर्क होऊ शकला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. यामुळे पोलिस अधिक्षकांच्या भुमिकेबाबत संशय निर्माण होत आहे. बीड जिल्हा पोलिसांकडून खोट्या केसेस करणे आणि खऱ्या अपराधाकडे दुर्लक्ष करणे सरावाचे झाले आहे. यामुळे कायद्याची अमलबजावणी होणे अशक्य झाले आहे. पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोवर्धन सानप हे दोन दिवस बेपत्ता होते. त्यांचा ग्रामस्थांनी शोध घेतला परंतु दोन दिवसांनी त्यांचे प्रेत शेतात आढळून आले. हा मृत्यू कशामुळे झाला, याचेही ठोस कारण पोलिसांनी दिलेले नाही. याबाबतही संशय आहे. अशा अपहरणांच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, याच बरोबर जिल्हा पोलीस दलाबाबत सामान्य माणसांच्या मनात अविश्वास निर्माण झालेला आहे. यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून विशेष पथक बीड जिल्ह्यात पाठवून याठिकाणी कारवाया कराव्यात, जेणेकरून पोलिसांकडून आयपीसी कलमांचा दुरूपयोग होणार नाही, पोलिस यंत्रणा कोणाच्या दबावात काम करणार नाही. याचबरोबर पवनचक्की कंपन्यांच्या गुडांनी जो गुन्हेगारीचा आलेख वाढविण्याचे काम केले आहे तो आलेखही कमी होईल, गुंडगिरीचा वापर करत असल्यामुळे पवनचक्की कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत असेही पत्रात म्हटले आहे. याविषयावर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी तातडीने ठोस पाऊले उचलली जातील, असे आश्वासन दिले. तिसरा आरोपी अटकेत सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करीत खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रांजणगाव (जि. पुणे) येथून प्रतीक भीमराव घुले या तिसऱ्या आरोपीस ताब्यात घेतले आहे. मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात ६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले व दोन साथीदारांनी घुसून अधिकारी व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. या प्रकरणात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी जामिनावर सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी ३ वाजता सरपंच संतोष देशमुख यांचा अपहरण करीत खून केला होता. त्यानंतर फरार झालेल्या सात आरोपींपैकी पोलिसांनी जयराम माणिक चाटे (रा. तांबवा ता. केज) व महेश सखाराम केदार (रा. मैंदवाडी) या दोन संशयित आरोपींना तांबवा येथून ताब्यात घेतले होते. तर प्रतीक भीमराव घुले (रा. टाकळी) या संशयित तिसऱ्या आरोपीस रांजणगाव (जि. पुणे) येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जोनवाल, जमादार भागवत शेलार, बप्पासाहेब घोडके, तुषार गायकवाड, गणेश मराडे यांनी कारवाई केली. माजलगावकरांचा मदतीचा हात माजलगावकरांनी मात्र त्यांची असलेली मदतीची परंपरा जोपासली आहे. मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटूंबीयांना मदतीचा हात देत आज दि. 11 डिसेंबर रोजी विवीध पक्ष व संघटनांच्या झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत अवघ्या एका तासात 13 लख 68 हजार रूपयांचा मदतनिधी जमा झाली आहे. तसेच शुक्रवारी शहरातील संभाजी महाराज चौकातून सकाळी 10.30 वाजता मदतफेरीचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच प्रशासनाला निवेदन देखील देण्यात येणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment