अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट:धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी, सर्व पुरावे केले सुपूर्द

अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवारांची भेट:धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची केली मागणी, सर्व पुरावे केले सुपूर्द

बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. मात्र आता धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरि बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. अंजली दमानिया यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहे. सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे कसे संबंध आहेत, त्यांच्यातील आर्थिक व्यवहार या सर्व गोष्टींचे पुरावे अंजली दमानिया यांनी अजित पवार यांना दिले आहेत. तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच एवढे पुरावे बघून देखील जर कारवाई नाही झाली तर मी टोकाची भूमिका घेईल, असा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, जवळ जवळ 25 ते 30 मिनिटे आमची भेट झाली. त्यांचे म्हणणे आहे की बीडमध्ये जे काही झाले आहे त्याचे मी अजिबात समर्थन करत नाही. मग माझे तेच म्हणणे आहे की तुम्ही राजीनामा का घेत नाही. तुम्ही पुरावे म्हणत होतात न, मी सगळेच्या सगळे पुरावे घेऊन त्यांना भेटायला गेले आणि आज मी त्यांना दाखवले की कसे धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे एकत्र बिझनेस कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक तफा कसा मिळत आहे आणि कसे हे ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये बसत आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अंजली दमानिया म्हणाल्या, यासाठी मी त्यांना मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांनी जे डायरेक्शन दिले होते आमदार आणि मंत्र्यांसाठी ते दाखवले. कुठलाही आमदार किंवा मंत्री स्वतःसाठी किंवा त्यांच्या घरच्यांसाठी आर्थिक नफा मिळवू शकत नाही. त्यात महाजेनको कडून यांना कसा नफा मिळत आहे हे पेपर्स दाखवले, त्यानंतर त्यांना मी त्यांची असलेली दहशत आणि त्यांचे असलेले सो कॉल्ड समर्थक जे समर्थक नाहीत पण ते दहशतवादी आहेत. त्यांनी अक्षरशः बीडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात बीडमध्ये दहशत केली आहे त्याचे सगळेच्या सगळे फोटो रील हे सगळे त्यांनी शांतपणे बघून घेतले आणि त्यांनी असे सांगितले की उद्या त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे त्यात मी जी काही कागदपत्रे दिली आहेत त्यावर दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर पुढचा जो निर्णय आहे ते घेतील. अंजली दमानिया म्हणाल्या, मला खात्री आहे की लोकांची भावना आहे, जनतेचा आक्रोश आहे आणि त्याव्यतिरिक्त खरेच जे कृत्य केले गेले ते इतके निर्घुण होते की महाराष्ट्रात कोणीही कुठेही थारा देऊ नये म्हणूनच आपला लढा आहे हे देखील मी अजित पवारांना सांगितले आणि त्यांचे देखील तेच मत होते की असे यापुढे कधीही होऊ नये. संतोष देशमुख यांच्यासोबत जे झालेले कृत्य आहे असे परत महाराष्ट्रात घडू ने म्हणून मी म्हंटले की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणे गरजेचे आहे. उद्या मुख्यमंत्र्यांना मी हे सगळे कागदपत्रे दाखवतो आणि योग्य तो निर्णय घेऊ, एकत्रितपणे निर्णय घेऊ असे अजित पवार यांचे म्हणणे आहे, आता बघूयात ते काय निर्णय घेतात.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment