धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात:ओबीसी नेत्याला धमकवले जात असल्याचा आरोप; रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा

धनंजय मुंडेंसाठी लक्ष्मण हाके मैदानात:ओबीसी नेत्याला धमकवले जात असल्याचा आरोप; रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा

बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या मदतीसाठी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे पुढे आले होते. त्यानंतर आता ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील मुंडे यांचे समर्थन केले आहे. आमच्या ओबीसी समाजाच्या मंत्र्याला मीडिया ट्रायल द्वारे धमकावण्याचे काम होत असेल तर महाराष्ट्रातील ओबीसी आणि बहुजन समाज त्या मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असे हाके यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर नेत्याच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा दावा देखील हाके यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा अप्रत्यक्षपणे संबंध असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या संदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या खात्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनाम्याची मागणी देखील केली आहे. मात्र, या विरोधात आता ओबीसी आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे. जालना दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी राज्यातील ओबीसी नेत्यांविरुद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. दमानियांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये अंजली दमानिया यांचे नाव अंजली दलालिया ठेवायला हवे. त्या निवडक नेत्यांची प्रकरण उकरून काढतात आणि त्यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करतात. हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम असल्याचा आरोप प्रा. हाके यांनी केला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत अंजली दमानिया यांनी जेवढी प्रकरण काढली, त्या प्रकरणांचे पुढे काय झाले? हे महाराष्ट्राला माहिती आहे. दमानिया केवळ मीडियात स्पेस शोधण्याचा काम करतात. त्यांना कोणीही गांभीर्याने घेऊ नये, असे देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांचा इंटरेस्ट कशात? संतोष देशमुख यांच्या हत्येचे राजकारणासाठी भांडवल केले जात असल्याचा आरोप देखील प्रा. हाके यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य शासन गृह विभाग आणि न्यायव्यवस्था असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे. मात्र ही व्यवस्था ज्यांना मान्य नसेल त्यांनी एसआयटी, सीआयडी, न्यायालय बरखास्त करून जरांगे सारख्या खुळचट माणसाला त्यावर नेमावे, असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. संतोष देशमुख यांच्या मारेकर्‍यांना शिक्षा होणे आवश्यक आहे की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा? नेमका मनोज जरांगे यांचा इंटरेस्ट कशात आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. मीडिया दिसला नाही तर जरांगेंच्या डोक्यावर परिणाम होईल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची पहिल्या दिवसापासून अतिशय समतोल भूमिका आहे. मात्र त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नादाला लागू नये. मनोज जरांगे पाटील हे मागील दोन वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी तेच कारणीभूत ठरले असल्याचा आरोप हाके यांनी केला आहे. मनोज जरांगे यांच्यासमोर कायमच विविध चॅनलचे बुम असतात. मीडियाचे बुम दिसले नाही तर मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम होईल. मात्र, जरांगे काय बोलतात याकडे लक्ष देण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. आम्हाला केवळ ओबीसीच्या प्रश्नांकडे मुख्यमंत्री कसे लक्ष देतात, यासाठी लढायचे असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण पुन्हा एकदा लागू करायचे असल्याचे हाके यांनी म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment