अजित पवारांवर लक्ष ठेवायला खास अधिकारी:एकनाथ शिंदेंचीही कोंडी, रोहिणी खडसे यांची महायुती सरकारवर जोरदार टीका

सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे भाषण वगळण्यात आले होते. यावरून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. रोहिणी खडसे यांनी एक्सवर प्रतिक्रिया देत भाजपवर तसेच महायुती सरकारवर टीका केली आहे. रोहिणी खडसे म्हणाल्या, दादा डोईजड होताय म्हणून आधी मंत्रालयातील फाईली दादांकडून भाईंकडे पाठवण्यात आल्या. त्यानंतर अर्थ विभागात लक्ष ठेवण्यासाठी स्वतःचा जवळचा अधिकारी आर्थिक सल्लागार म्हणून बसवला. मग भाईंचे पंख छाटण्यासाठी निधीत-पालकमंत्री पदात भेदभाव केला. पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या, पुन्हा रायगडावर दादांना डावलून भाईंना बोलण्याची संधी दिली. मात्र भाई 2 पाऊल पुढचे निघाले. मोटा भाय मुंबईत आल्यावर एकटेच जाऊन पाऊण तासाची मीटिंग करून आले. मग लक्षात आले भाई पण जास्तच पुढे पुढे करतायेत. मग दोघांना जागेवर आणण्यासाठी थेट भाई-दादांचे चैत्यभूमीवरील भाषण कापून टाकले. एकंदरीत काय तर सरकार कसे चालू आहे? प्रचंड ओढाताण, प्रचंड रस्सीखेच, एकमेकांच्या पायात, आज नाहीतर उद्या अडखळून पडणार हे निश्चित, असे भाकीतही रोहिणी खडसे यांनी केले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात महायुतीमध्ये मतभेद आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात आले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेत अजित पवार यांच्या अर्थ खात्याविषयी तक्रार केल्याचे बोलले जात आहे. मात्र, अजित पवार यांनी यावर बोलताना म्हटले होते की काही नाराजी असती तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांशी नाहीतर माझ्याशी चर्चा केली असती.