अजित पवार धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठाम:संतोष देशमुख खून प्रकरणात आरोप करणारे सुरेश धस, प्रकाश सोळंकेंना DPDC मधून हटवले

अजित पवार धनंजय मुंडेंच्या पाठीशी ठाम:संतोष देशमुख खून प्रकरणात आरोप करणारे सुरेश धस, प्रकाश सोळंकेंना DPDC मधून हटवले

राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आता मंत्री धनजंय मुंडे यांच्या पाठीशी ठाम उभे राहिलेत. मस्साजोग येथील संतोष देशमुख खून प्रकरण लावून धरणारे, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंकेंना जिल्हा नियोजन समितीतून हटविण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतल्याचे समजते. हा निर्णय म्हणजे एक प्रकारे धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याची चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्हा नियोजन समितीच्या विधिमंडळ सदस्यमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांच्या नावात अजित पवार यांनी बदल केला आहे. भाजप आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांचा हा निर्णय बीडच्या राजकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे भाजपचे आमदार सुरेश धस आणि मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी करणारे प्रकाश सोळंके या दोघांसाठी हा मोठा धक्का आहे. त्यामुळे अजित पवार यांनी या दोन्ही विरोधकांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समिती वरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त रद्द करण्यात आल्या होत्या. त्या जागी आता या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या वतीने राज्यातील सर्वच नियोजन समितीने वरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे समित्यांवर केवळ पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी राहिले होते. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील नामनिर्देश करावयाच्या सदस्यांमध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातील आमदार विजयसिंह पंडित यांची वर्णी लागली आहे. तर दुसऱ्या सदस्यपदी केज विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार नमित मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाचे महायुतीमध्ये काही पडसाद उमटतात का? हे आता बघावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही दिली तंबी बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आणि तशा कृत्यांना थारा दिला जाणार नाही, असा इशारा बीडचे पालकमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. या दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेत त्यांना हा इशारा दिला आहे. अजित पवार पालकमंत्री झाले आता काळजी नाही, अशा विचारत असाल तर तो मनातून काढून टाका. मी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचे वागू नका, असे देखील अजित पवार यांनी खडसावून सांगितले. बीड जिल्ह्यामध्ये कोणी कुठल्याही गोष्टीसाठी जबाबदार असेल आणि जर कोणी वेडेवाकडे प्रकार करणार असेल किंवा विकास कामांत अडथळा आणणारा असेल तर ते खपवून घेणार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. गरज वाटल्यास अशा लोकांवर मकोका लावायला देखील मी मागेपुढे पाहणार नाही. तिथे तथ्य असेल तिथे कारवाई केली जाईल. मात्र तथ्य नसेल तर त्याच्यावर कारवाई होणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment