अवैध दारू विरोधी कारवाईत कर्मचाऱ्याचा मृत्यू:विशेष बाब म्हणून कुटुंबाला साडेसात लाख नुकसान भरपाई, उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांची माहिती

अवैध दारू विरोधी कारवाईत कर्मचाऱ्याचा मृत्यू:विशेष बाब म्हणून कुटुंबाला साडेसात लाख नुकसान भरपाई, उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांची माहिती

अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील जवान तथा वाहन चालक कैलास गेणू कसबे यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विशेष बाब म्हणून साडेसात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकरणांमध्ये सत्वर मदत होण्याच्या दृष्टीने गृह विभागाच्या धर्तीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कायमस्वरुपी धोरण तात्काळ करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी दिली. नाशिक राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक 1 मधील अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अवैधपणे मद्यविक्री करणाऱ्या ढाब्यावर 7 जुलै 2024 रोजी रात्री कारवाई केली होती. अवैध मद्यविक्री करणाऱ्या आरोपींच्या वाहनाचा पाठलाग करीत असताना राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या भरारी पथकाच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने धडक दिली व त्यामध्ये जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांचा मृत्यू झाला होता. उपमुख्यमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांनी या खात्याचा कार्यभार घेताच या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घातले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे सन 2014 मध्ये गृह विभागाने केलेल्या मदतीच्या धर्तीवर (पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय ठरल्याप्रमाणे साडेसात लाख रुपये) राज्य उत्पादन शुल्क विभागातील दिवंगत जवान कैलास कसबे यांच्या वारसांना विशेष बाब म्हणून 7.50 लाख नुकसान भरपाई मंजूर केली आहे. दरम्यान, संबंधित मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला विभागाकडून मदत देऊ, अशी घोषणा तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री शंभुराजे देसाई यांनी केली होती. तसेच, आमची जी मोहीम सुरू आहे ती अशीच सुरु राहील. कर्तव्य बजावत असताना कर्मचाऱ्याचा जीव घेणे योग्य नाही. यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment