अनिल देशमुखांवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा:अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणे कारणीभूत, उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

अनिल देशमुखांवरील हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा:अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणे कारणीभूत, उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री हल्ला झाला होता. या हल्ल्याचे पडसाद आता राज्यभर पसरत असल्याचे दिसत आहे. नरखेड येथून प्रचारसभा आटपून काटोलकडे परतत असताना बेला फाट्याजवळ अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले. यावर आता ज्येष्ठ सरकारी विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख हल्लाप्रकरणी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, निश्चितच अशा प्रकारचा हल्ला होणे हे दुर्दैव आहे. हा हल्ला कोणी केला? केव्हा झाला? कसा झाला? याबाबत पोलिस तपास चालू आहे. पोलिस तपासानंतर सत्य उघडकीस येईल. परंतु, तो तपास पूर्ण होण्याआधी जी काही पत्रकबाजी चालू आहे, ज्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत ते गैर आहे असे मला वाटते. तसेच हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाला असावा, अशी शंका देखील उज्ज्वल निकम यांनी उपस्थित केली आहे. पुढे बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले, या हल्ल्यामागे काहीतरी व्यक्तीगत कारण असेल हे देखील नाकारता येत नाही. पोलिस तपासानंतर दूध का दूथ आणि पाणी का पाणी होईल. पोलिस तपास होईपर्यंत थोडी कळ सोसावी लागेल. परंतु, लोकसभेच्या मानाने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात नेत्यांचे एकमेकांवरील हल्ले, प्रतिहल्ले, राजकीय स्टंटबाजी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अशा हल्ल्यांना भडकाऊ भाषणं कारणीभूत आहेत असे मला वाटते. प्रत्येक नेत्याने संयम ठेवायला हवा, असा सल्ला देखील उज्ज्वल निकम यांनी दिला आहे. अनिल देशमुख यांच्या हल्ल्यावर शरद पवार काय म्हणाले?
अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, काटोलमध्ये लोकांकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाला ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे. हे काही प्रवृत्तीना सहन झाले नाही. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या डोक्याला लागले आहे. त्यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोप ठीक आहे. मात्र, अशा प्रकारचा हल्ला करणे हे अयोग्य आहे. या घटनेचा मी निषेध करतो. सुप्रिया सुळेंनी केला घटनेचा निषेध
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती. हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment