बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात भाजप नेत्याच्या नावाची चर्चा:मोहित कंबोज म्हणाले, ‘आमच्यात चांगली मैत्री होती, सत्य बाहेर यायला हवे’
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली होती. या हत्याप्रकरणी आता पोलिसांच्या वतीने तपास सुरू आहे. तर या प्रकरणात आता भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांचे देखील नाव चर्चेत आले आहे. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झीशान सिद्दिकी यांनीच वडिलांच्या डायरीमध्ये भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत झोपडपट्टी विकास योजनेचे संबंधित वादाचाही समावेश असू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तपास व्हावा, असे त्यांनी म्हटले होते. यामुळे आता मोहित कंबोज यांनी देखील या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे. या संदर्भात मोहित कंबोज यांनी म्हटले की, बाबा सिद्दिकी यांच्याशी माझे चांगले संबंध होते. आमच्यात चांगली मैत्री होती. आम्ही अनेक वेळा अनेक विषयांवर चर्चा करत होतो. त्यांच्या हत्येची बातमी कळताच मला मोठा धक्का बसला. त्यांच्या कुटुंबासोबत मी देखील हॉस्पिटलमध्ये दाखल झालो होतो. या प्रकरणात सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य बाहेर यायला पाहिजे, असे देखील कंबोज यांनी म्हटले आहे. 12 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री सिद्दिकी यांची मुंबईतील वांद्रे पूर्व भागात त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात बिश्नोई गँगने हत्योची जबाबदारी घेतली होती. मात्र, या प्ररकणात आणखी काही धागेदोरे असू शकतात, अशी शक्यता झीशान सिद्दिकी यांनी व्यक्त केली होती. मोहित कंबोज याने वडिलांशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला होता – झीशान बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झीशान सिद्दिकी याने वडिलांच्या डायरीत अनेक विकासक, कंत्राटदार आणि भाजप नेत्यांची नावे लिहिली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. हत्येच्या दिवशी भाजप नेते मोहित कंबोज याने वडिलांशी व्हॉट्सॲपवर संपर्क साधला होता. त्यांच्यात भेटीण्याबाबत चर्चा झाली होती. वांद्रे झोपडपट्टी विकास योजनेशी संबंधित वादांचाही या हत्येच्या तपासात समावेश करण्यात यावा, असे झीशान यांनी म्हणाले आहे. कोण आहेत मोहित कंबोज? मोहित कंबोज हे मूळचे उत्तर प्रदेशचे आहेत. ते 2004 मध्ये मुंबईत आले. 2005 मध्ये केबीजी ज्वेलर्स नावाने त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला. ज्वेलरी व हिरे व्यवसायातील सुरुवातीचे धडे त्यांनी आपले वडील बनवारीलाल कंबोज यांच्याकडून घेतले. त्यानंतर स्वत: या व्यवसायात जम बसवला. या व्यवसायातील यशामुळे 2012 ते 2019 पर्यंत त्यांनी इंडियन बुलियन व ज्वेलरी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्षपद पटकावण्यापर्यंत मजल मारली. मोहित कंबोज यांनी 2013 मध्ये साली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी मुंबईतील दिंडोशी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. पण शिवसेनेच्या सुनील प्रभू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. कंबोज यांचा पराभव झाला खरा, पण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार व पक्षातील अनेक निष्ठावंत व जुन्या इच्छुकांना डावलून त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले होते. त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2014 मध्ये त्यांची संपत्ती 253.53 कोटी इतकी होती. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. शूटर म्हणाला- बाबा सिद्दीकी दाऊदशी जोडलेले होते:तर झीशान म्हणाले- पप्पा डायरी लिहायचे; यात भाजप नेते, बिल्डर, विकासक यांची नावे, त्यांचीही चौकशी व्हावी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घालणारा मुख्य शूटर शिवकुमार गौतम याने दावा केला आहे की, दाऊद इब्राहिमशी असलेले संबंध आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग असल्याने अनमोलने सिद्दीकीला ठार मारण्याचे आदेश दिले होते. पूर्ण बातमी वाचा….