भाजपची राज्यपाल, शिंदेंची खासदारकीची ऑफर:ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा गौप्यस्फोट; ठाकरेंना सोडणार नसल्याची ग्वाही
मला अनेकदा ऑफर आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीही बडे नेते बोलले होते. शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपकडून राज्यपालपदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. पण मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक आहे. मी माझ्या एकनिष्ठतेला तडा जाऊ देणार नाही, असेही खैरे यांनी स्पष्ट केले आहे. चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहु लागले आहेत. सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. शिंदे गट आणि भाजपकडून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून आमिष दाखवले जात आहे. या सर्व घडामोडींवर भाष्य करताना चंद्रकांत खैरेंनी उपरोक्त गौप्यस्फोट केला. आमचे शिवसैनिक कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर महापालिका आम्ही आणणार म्हणजे आणणारच, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. मातोश्रीचा माझ्यावर विश्वास
मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतोय, करत राहीन. जरी काही लोक माझ्याविरोधात काड्या करणारे तिथे पोहोचले असले तरी मी काम करत असतो. माझा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे. मातोश्रीचा माझ्यावर विश्वास आहे. मी अनेक वर्षापासून एकनिष्ठ आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. लोकसभा निवडणुकीआधी उमेदवार मिळत नव्हता, तेव्हा शिंदे गटाकडून शिरसाट यांनी काही लोकांना पाठवले होते. आमच्याकडे त्यांना घेऊन या असे सांगितले, असे दावाही त्यांनी केला. राज्यपालपदाचीही ऑफर देण्यात आली
भाजपचे लोक माझ्याकडे खूप वेळा येऊन गेले. माझा संपर्क अनेक वर्ष दिल्लीत होता. मला दिल्लीतून अनेक मान्यवरांची ऑफर होती. तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला खासदार करतो, मंत्री करतो. अलीकडे मला हरिभाऊ बागडेंसारखे राज्यपाल करण्याचीही ऑफर देण्यात आली, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. काही झाले तरी ठाकरेंना सोडणार नाही मी जिथे आहे, तिथे खुश आहे. मी राज्यपाल म्हणून का जाऊ? माझ्याकडे शिवसैनिक म्हणून सगळ्यात मोठे पद आहे. मला सर्वसामान्य कार्यकर्ता ते 20 वर्ष खासदार, मंत्री होतो. मला साहेबांनी खूप काही दिले आहे. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे. भलेही मला काही मिळाले नाही तरी चालेल. मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, असे चंद्रकांत खैरे म्हणाले. शिंदेंना स्वतःच्या थोबाडीत मारल्यासारखे होईल
चंद्रकांत खैरे यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरे – देवेंद्र फडणवीस एकत्रित येऊ शकतात का? यावरही प्रतिक्रिया दिली. राजकारणात काहीही होऊ शकते. एकनाथ शिंदे आता हळूहळू बाजूला चाललेत. दोन्ही नेते आहेत. उद्धव ठाकरे खूप बुद्धिवान आहेत. हे सगळे फाटाफूट करून चाललेत. त्यांना स्वत:च्या थोबाडीत मारल्यासारखे होईल, असे ते म्हणाले. चंद्रकांत खैरेंचे विश्वासू घोडेले शिंदे गटात
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नंदकुमार घोडेले आणि माजी महापौर अनिता घोडेले, ठाकरे गटाचे मराठवाडा सचिव ॲड. अशोक पटवर्धन यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नंदकुमार घोडेले हे शिवसेनेचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात. ते माजी महापौर देखील राहिले आहेत. घोडेले हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. यामुळे आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, चंद्रकांत खैरे यांनी आपण उद्धव ठाकरेंना सोडणार नसल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.