‘फेंगल’चा 4 राज्यांना फटका; चेन्नई विमानतळ 15 तास बंद:पुद्दुचेरी-तामिळनाडूचे 7 जिल्हे चिंब, जीवितहानी नाही
बंगालच्या खाडीत काही दिवसांपासून घोंगावत असलेले फेंगल चक्रीवादळ शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता पुद्दुचेरीच्या पूर्वेकडील समुद्रकिनारी धडकले. यादरम्यान हवेचा वेग ९० किमी प्रतितास होता. वादळ धडकण्याची ही प्रक्रिया सुमारे ४ तास चालली. त्यामुळे तामिळनाडूतील चेन्नईसह ७ जिल्ह्यांत, पुद्दुचेरी, कर्नाटक व आंध्रातील सागरी किनारी भागात जोरदार पाऊस झाला. ८० किमी प्रतितास वेगाने हवेचा वेग होता. चेन्नईच्या समुद्रकिनारी एक मीटर उंचीच्या लाटा धडकत होत्या. चक्रीवादळाच्या तडाख्यातून विमानांचे संरक्षण करण्यासाठी चेन्नईचे विमानतळ दुपारी १२.३० ते सायंकाळी ७ पर्यंत बंद ठेवण्यात आले होते. पण रात्रीही जोरदार पाऊस सुरू असल्याने रविवारी पहाटे ४ वाजेपर्यंत उड्डाणे बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने घेतला होता. त्यामुळे चेन्नईतून ५५ विमाने रद्द करावी लागली. तर बाहेरहून येणारी १२ विमाने बंगळुरूच्या विमानतळावर वळवण्यात आली. वादळ येण्याच्या ६ तास आधीच जोरदार पाऊस सुरू झाल्याने चेन्नईच्या खालचा भाग जलमय झाला होता. वादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर त्याची तीव्रता थोडी कमी झाली. परंतु पुद्दुचेरी व तामिळनाडूतील कांचीपुरम, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कुड्डालोर, विल्लुपूरम, कल्लाकुरिची, चेन्नई व मरियादुथुराई जिल्ह्यात पावसाचा जोर रात्री उशिरापर्यंत कायम होता. चेन्नई विज्ञान केंद्राच्या मते, अजून ३ दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. खुशखबर: पश्चिमी विक्षोभाने ४ राज्यांमध्ये हिमवर्षाव शक्य पाकिस्तानातून येणारे पश्चिमी विक्षोभ जम्मू-काश्मीरच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे पुढच्या एक-दोन दिवसांत काश्मीर, लड्डाख, हिमाचल, व उत्तराखंड या भागात हिमवर्षावाची शक्यता. समुद्रसपाटीपासून ३ हजार मीटर असलेल्या भागात बर्फवृष्टी शक्य. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान व पश्चिमी उत्तर प्रदेशातही ढगाळ वातावरण असेल, पण पावसाची शक्यता कमीच. पुढे काय : आगामी २४ तासांत १२ राज्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माहितीनुसार, फेंगल वादळामुळे तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगड व मध्य प्रदेशच्या दक्षिण भागात पुढच्या २४ तासांत पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड व उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, केरळमधील काही भागातही एक- दोन दिवसांत ढगाळ वातावरण, पावसाची शक्यता आहे. पुद्दुचेरीत रविवारीही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येथील १२ लाख लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. घरीच राहा किंवा सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना दिल्या. चक्रीवादळामुळे चेन्नईत सुमारे ८ तास पाऊस झाला. त्यामुळे मरीना बीच जलमय झाले होते. चेन्नई मनपाच्या माहितीनुसार, शहरात शिरलेले पाणी उपसण्यासाठी २२ हजार इंजिनियर्स १०० हॉर्सपाॅवरचे १६०० मोटारपंपसह तैनात होते. त्यामुळे जीवितहानी टळली.