गाडीचा हप्ता चुकवल्याने कर्जदाराच्या मुलाचे अपहरण:डांबून ठेवत 10 हजारांच्या खंडणीची मागणी, बँकेच्या 3 अधिकाऱ्यांवर सोलापुरात गुन्हा
अनेकजण खासगी बँकांकडून विविध कारणांनी कर्ज घेतात. मात्र, कर्जाचे हप्ते चुकल्यानंतर त्याची वसुली अतिशय भयंकर पद्धतीने केली जात असल्याचे समोर आले आहे. वाहनाचे हप्ते चुकवल्यामुळे चक्क कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला. इतकेच नाही तर मुलाला सोडण्यासाठी या बँकेच्या अधिकाऱ्यांकडून खंडणी देखील मागण्यात आली. सोलापुरातील जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील एका व्यक्तीने कार खरेदी करण्यासाठी खासगी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, काही कारणास्तव कर्जदाराला कर्जाचे हप्ते वेळेवर भरता आले नाही. हप्ते वेळेवर न भरल्यामुळे संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केले. सोलापुरात एका खाजगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची ही मुजोरी दिसून आली. या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्याला एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते. मुलाच्या सुटकेसाठी खंडणीही मागितली याप्रकरणी, कर्ज वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या वसुली कर्मचाऱ्यांविरोधात जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केलेच, मात्र त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी 10 हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याचे समोर आले. पोलिस आयुक्तांचा इशारा
चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा सोलापूरचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे. बँक किंवा फायनान्स कंपनींचे एजंट सक्तीची किंवा गुंडगिरी पद्धतीने वसुली करत असतील तर कर्जदार किंवा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन विजय कबाडे यांनी सोलापूरच्या नागरिकांना केले आहे. नागरिकांमध्ये तीव्र संताप खासगी सावकारांचा जाच नको म्हणून अनेकजण कर्जासाठी खासगी बँका, फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतात. मात्र, आता या खासगी बँका, फायानान्स कंपन्यांच्या जाचाच्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. अनेकजण खासगी बँकांकडून विविध कारणांनी कर्ज घेतात. मात्र, कर्जाचे हप्ते चुकल्यानंतर त्याची वसुली अतिशय भयंकर पद्धतीने केली जात असल्याचे सोलापूर येथील प्रकरणावरून समोर आले आहे. खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मुजोरी करण्यात आल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.